विमा महामंडळ रुग्णालय : हेलपाटे, विलंबाने विमा कामगार, रुग्ण हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 12:23 PM2019-09-13T12:23:15+5:302019-09-13T12:26:53+5:30
कोल्हापूर येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयामध्ये (ईएसआयसी) बाह्यरुग्ण विभागापाठोपाठ (ओपीडी) आता आपत्कालीन कक्ष सुरू झाला आहे. नव्या सुविधांच्या उपलब्धतेची नवीन पावले पडत असली तरी विमा कामगारांचा त्रास काही कमी झालेला नाही. उपचारासाठीची आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे हेलपाटे आणि विलंबाने कामगार आणि रुग्ण हैराण झाले आहेत.
कोल्हापूर : येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयामध्ये (ईएसआयसी) बाह्यरुग्ण विभागापाठोपाठ (ओपीडी) आता आपत्कालीन कक्ष सुरू झाला आहे. नव्या सुविधांच्या उपलब्धतेची नवीन पावले पडत असली तरी विमा कामगारांचा त्रास काही कमी झालेला नाही. उपचारासाठीची आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे हेलपाटे आणि विलंबाने कामगार आणि रुग्ण हैराण झाले आहेत.
कामगार संघटनांनी केलेली आंदोलने आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यांची दखल घेऊन येथील ताराबाई पार्क परिसरातील ‘ईएसआयसी’ची ओपीडी आॅक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाली. त्यामुळे थोड्या प्रमाणात विमा कामगार, रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाली. आता जुलैअखेरीस या ठिकाणी २४ तास सुरू असणारा आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला.
दिल्ली येथील ईएसआयसी कॉर्पोरेशनकडून सुविधा वाढविण्यात येत आहेत. मात्र, मूळ दुखणे दूर करण्यात ‘ईएसआयसी’चे व्यवस्थापन कमी पडत आहे. ‘ओपीडी’साठी वर्षभरापूर्वी औषधशास्त्र, सर्जरी, प्रसूतिशास्त्र, अस्थिरोग, पॅथॉलॉजी, नेत्रविभाग, बालरुग्ण विभागांसाठी दहा तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासह सध्या पाच वैद्यकीय अधिकारी आणि ‘ईएसआयसी’च्या कॉलेजमधून शिक्षण घेतलेले सहा विद्यार्थी या ठिकाणी सेवा पुरवितात.
ओपीडी, आपत्कालीन कक्ष सुरू असल्याने रोज किमान २०० रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. मात्र, अनेकदा डॉक्टर भेटत नाहीत. ते वेळेत उपलब्ध होत नाहीत. काही वेळा आवश्यक औषधे मिळत नाहीत. उपचार आणि वैद्यकीय देयकांच्या (बिल) पूर्ततेबाबत माहिती घेताना अथवा कागदपत्रांची पूर्तता करताना दमछाक होत आहे. त्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात.
१५ दिवस ते महिनाभर विलंब होत असल्याचे काही विमा कामगार, रुग्णांनी बुधवारी सांगितले. सुविधा उपलब्ध होणे चांगले आहे. मात्र, त्याबरोबरच अनावश्यक स्वरूपातील त्रास कमी करण्याकडे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने लक्ष द्यावे, अशी मागणी कामगारांतून होत आहे.
पुढील महिन्यात तज्ज्ञांची मुदत संपणार
‘ओपीडी’तील १० तज्ज्ञांपैकी नऊजणांची कंत्राटी स्वरूपात नेमणूक करण्यात आली. त्यांची मुदत दि. १४ आॅक्टोबर रोजी संपणार आहे. या ठिकाणी १९ तज्ज्ञांची गरज असताना वर्षभरापूर्वी १० तज्ज्ञ उपलब्ध झाले. त्यांची मुदत संपण्यापूर्वी पुढील कालावधीसाठी १८ तज्ज्ञांची नियुक्ती करणे गरजेचे आहे, अन्यथा ओपीडीच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.
त्रास कमी करण्याचा प्रयत्न
ओपीडीसह आपत्कालीन कक्षाद्वारे जास्तीत जास्त रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ईएसआयसी कार्यरत आहे. १०० बेडचे रुग्णालय सुरू करण्यासाठी तयारी सुरू असल्याचे कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. गोलडार यांनी सांगितले. ओपीडीसाठीच्या तज्ज्ञांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
१०० बेडच्या रुग्णालयासाठी इलेक्ट्रिकल कामाची निविदा निघाली आहे. बांधकाम करण्यासाठी दिल्लीतील अभियंत्यांच्या पथकाने पाहणी केली आहे. डॉक्टर आणि औषधांच्या उपलब्धतेबाबत रुग्णांच्या तक्रारी होत आहेत. त्या सोडविण्यासह कामगार आणि रुग्णांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. गोलडार यांनी सांगितले.
राज्यभर आंदोलन उभारणार
उद्योगांचे मालक आणि कामगारांकडून विम्यापोटी जितक्या प्रमाणात दरमहा रक्कम ‘ईएसआयसी’कडे जमा होते, त्या प्रमाणात या रुग्णालयाकडून वैद्यकीय सेवा मिळत नसल्याचे राज्यभर वास्तव आहे. महाराष्ट्राबाबत ‘ईएसआयसी’चे कोणतेही नियोजन नाही. त्याचा फटका विमा कामगारांना बसत आहे. दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे श्रमिक महासंघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी सांगितले.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- कोल्हापूरमधील विमाधारक कामगाराची संख्या : १ लाख २१ हजार
- वैद्यकीय सुविधेसाठी या कामगारांसह पात्र ठरणारे त्यांचे कुटुंबीय : सुमारे चार लाख
- उद्योगांचे मालक आणि कामगारांकडून ‘ईएसआयसी’कडे वर्षाकाठी जमा होणारी रक्कम : सुमारे ६५ कोटी