दीनानाथसिंह यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचा ओघ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:36 AM2018-10-02T00:36:48+5:302018-10-02T00:36:53+5:30

Helpline for Dina Nath Singh's surgery | दीनानाथसिंह यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचा ओघ सुरूच

दीनानाथसिंह यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचा ओघ सुरूच

Next

कोल्हापूर : हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी दानशूर व्यक्ती धावून येत आहेत. सोमवारी दिवसभर अनेकजणांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांना सुमारे दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली.
दीनानाथसिंह यांच्या डाव्या फुफ्फुसात रक्ताच्या दोन गाठी असल्याचे, प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याचे निदान झाले. रक्ताच्या गाठीवरील उपचार झाल्यानंतर महिन्याभरात प्रोस्टेट ग्रंथींची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीचा हात हवा आहे. हे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच त्यांच्यावरील उपचारासाठी विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला.
सोमवारी दुपारी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दीनानाथसिंह यांची भेट घेऊन ‘पैलवान, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काळजी करू नका,’ असा धीर देत त्यांना संघातर्फे पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला. याप्रसंगी संघाचे पेट्रेन चीफ बाळ गायकवाड, उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्रकाश खोत, अशोक माने, नामदेव पाटील, कार्याध्यक्ष संभाजीराव वरुटे, जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, सेक्रेटरी संभाजी पाटील, खजानिस बाळासाहेब शेटे उपस्थित होते.
पुणे येथील गोकुळ तालमीचे वस्ताद शामराव यादव यांनी एक लाखांचा धनादेश दिला. कागल येथील उद्योजक उमेश सिंह यांनी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. महाराष्ट्र केसरी शिवाजीराव पाचपुते यांनी २१ हजारांची आर्थिक मदत केली. याप्रसंगी महाराष्ट्र केसरी आप्पा कदम, बापू लोखंडे, कुलदीप यादव, बाळू पाटील यांची उपस्थिती होती.
दरम्यान, सायंकाळी आमदार अमल महाडिक यांनी दीनानाथसिंह यांची भेट घेतली. यावेळी दीनानाथसिंह यांच्यासारखे पैलवान आपला इतिहास आहेत. हा इतिहास जतन करून नव्या पिढीला त्याची ओळख करून देण्याची जबाबदारी आपली आहे. दीनानाथसिंह यांच्या उपचारासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी बोलणे झाले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दीनानाथसिंह यांच्या कुटुंबीयांना दिले. याप्रसंगी उजळाईवाडीचे ग्रा.पं. सदस्य तानाजी चव्हाण, पोपट नाईक, शहाजी मुळीक व नागरिक उपस्थित होते. सोमवारी रात्री कोतोली येथील परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने उपचारासाठी १५ हजार रुपये दिले. यावेळी अध्यक्ष उत्तम लव्हटे, उपाध्यक्ष उमेश पाटील, सचिव गुलाब अत्तार, जयवंत लव्हटे, आदी उपस्थित होते.
हे आले मदतीसाठी धावून
म्हाडा पुणेचे अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी घेतली शस्त्रक्रिया व औषधोपचारांची जबाबदारी.
पुणे गोकुळ तालमीचे वस्ताद शामराव यादव यांच्याकडून एक लाख रुपये
कोल्हापूर जिल्हा तालीम संघाकडून ५० हजार रुपये
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे यांच्याकडून २५ हजार रुपये
सांगली जिल्हा तालीम संघातर्फे २५ हजार रुपये
युएसएके अ‍ॅग्रोतर्फे २५ हजार रुपये
उद्योजक उमेशसिंह यांच्याकडून २५ हजार रुपये
महाराष्ट्र केसरी शिवाजीराव पाचपुते यांच्याकडून २१ हजार रुपये
परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून १५ हजार रुपये

Web Title: Helpline for Dina Nath Singh's surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.