‘हेमरस’ची ऊस वाहतूक रोखली
By admin | Published: November 9, 2015 11:47 PM2015-11-09T23:47:21+5:302015-11-10T00:01:36+5:30
ऊसदर आंदोलन : राजगोळी येथे सहा तास ऊस अडविला
चंदगड : हेमरस कारखान्याने सन २०१४ मध्ये गाळप केलेल्या उसाला देय असलेला प्रतिटन ९० रुपयांचा हप्ता देण्यास टाळाटाळ केल्याने सोमवारी राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तब्बल सहा तास ऊस वाहतूक रोखली होती. हेमरस कारखाना प्रशासनाने १५ जानेवारी २०१६ पर्यंत प्रलंबित असलेले प्रतिटन ९० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यास जमा करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने ऊस वाहतूक सुरळीत करण्यात आली. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी राजगोळी खुर्द येथे हेमरस कारखान्याकडे जाणारी वाहने अडविली. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल सहा तास वाहतूक रोखल्याने वाहनांच्या जवळपास दोन किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या होत्या. कारखाना प्रशासन येईपर्यंत वाहतूक रोखण्याचा इशारा दिला.सहा तासांनंतर कार्यकारी संचालक भरत कुंडल, शेती अधिकारी उत्तम पाटील व स्वाभिमानीचे राजेंद्र गड्यान्नावर, तालुकाध्यक्ष बाळाराम फडके, प्रा. दीपक पाटील, तानाजी देसाई, नवनीत पाटील, गोपाळ गावडे, विश्वनाथ पाटील, एम. डी. भोगण, राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली.बैठकीत १५ जानेवारी २०१६ पर्यंत दोन हप्त्यांत थकीत प्रतिटन ९० रुपये रक्कम जमा करण्याचे आश्वासन कार्यकारी संचालक भरत कुंडल यांनी दिले.यावेळी स्वाभिमानीचे गड्यान्नावर यांनी हेमरसने यावर्षीच्या गळितास आलेल्या उसाची ‘एफआरपी’प्रमाणे एकरकमी रक्कम द्यावी, अन्यथा उसाचे एकही कांडे कारखान्याला देणार नसल्याचा इशारा दिला. (प्रतिनिधी)