हेंद्रे यांच्या हॉस्पिटलवर छापा
By admin | Published: March 31, 2015 12:42 AM2015-03-31T00:42:41+5:302015-03-31T00:42:55+5:30
गर्भपाताचा संशय : आरोग्य विभागाची कारवाई; नैसर्गिक गर्भपात झाल्याचे स्पष्टीकरण
कोल्हापूर : गर्भपात केल्याच्या संशयावरून पाटणकर कॉलनी, ताराबाई पार्क येथील डॉ. प्रवीण हेंंद्रे यांच्या रंगनाथ हॉस्पिटलवर रविवारी रात्री पोलीस व महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी छापा घातला. या प्रकरणाची महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सखोल चौकशी सुरू असून, त्यांच्या अहवालात तथ्य आढळल्यास शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. डॉक्टर म्हणून प्रथम पेशंट वाचविण्यासाठी प्रयत्न केला व नैसर्गिक गर्भपात झाला. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीस मी तयार असल्याचे डॉ हेंद्रे यांनी म्हटले आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, कम्युनिस्ट पक्षाचे सहसचिव सतीशचंद्र कांबळे, शिवाजी माळी व दिलदार मुजावर यांना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रंगनाथ हॉस्पिटलमध्ये गर्भपाताची शस्त्रक्रिया सुरू असल्याचा निनावी फोन आला. त्यांनी काही कार्यकर्त्यांना रुग्णालयात पाठवून माहितीची खातरजमा केली. त्यानंतर कांबळे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित हे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भूतकर व दोन कॉन्स्टेबलना घेऊन रुग्णालयात आले. त्यांनी याप्रकरणी डॉ. प्रवीण हेंद्रे यांच्याकडे चौकशी केली. येथील रजिस्टर व केसपेपरमधील संबंधित महिला प्रीती हरीश वरल्यानी-वसंतानी (वय ३३, रा. ताराबाई पार्क) हिच्या नावावर खाडाखोड केल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांना घटनास्थळी पाठविले. डॉ. पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी केली असता गर्भ स्त्रीजातीचा आढळून आल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी डॉ. हेंद्रे यांच्याकडे चौकशी केली. रुग्ण प्रीती वरल्यानी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपला यापूर्वी सात वेळा गर्भपात झाला असून, यापूर्वी दोन मुली असल्याचे सांगितले. रुग्णालयातील प्रथमदर्शी सर्व हालचाली संशयास्पद वाटल्याने डॉ. पाटील यांनी पोलिसांच्या साक्षीने सर्व प्रकरणाचा पंचनामा केला. डॉ. हेंद्रे, रुग्ण वरल्यानी यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी, नातेवाइकांचा जबाब घेतला. ही प्रक्रिया पहाटे चारपर्यंत सुरू होती. घटनेचा अहवाल डॉ. पाटील यांनी शाहूपुरी पोलिसांना दिला, परंतु या अहवालामध्ये त्रुटी असल्याने तो पुन्हा आरोग्य अधिकारी पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी शाहूपुरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
निष्पक्ष चौकशीस तयार : डॉ प्रवीण हेंंद्रे
यासंदर्भात रंगनाथ हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रवीण हेंंद्रे यांनी दिलेल्या खुलाशामध्ये म्हटले आहे की, ‘ प्रीती वरल्यानी या १८ ते २० आठवड्यांच्या गर्भवती होत्या. त्यांचा वारंवार गर्भपात होत होता. यापूर्वी मिरजमध्ये गर्भाशयाला टाका घालूनही साडेसहा महिन्यांत गर्भपात होऊन मूल दगावले होते. यावेळेसदेखील त्या कोल्हापुरातील दुसऱ्या रुग्णालयात गर्भ टिकावा म्हणून रोज ‘हेपारिन’चे इंजक्शन घेत होत्या. त्याच रुग्णालयात गर्भाची नऊ महिने वाढ व्हावी, यासाठी गर्भाशयाच्या मुखाला टाका घातला होता, परंतु उपचार सुरू असूनही व गर्भाशयाच्या मुखाला टाका घातला असतानाही पोट दुखत होते. गर्भाशयाच्या कळा सुरू झाल्याने त्या आमच्याकडे शनिवारी (दि. २८) दाखल झाल्या. गर्भाशयाला येणाऱ्या कळांमुळे टाका घातलेल्या मुखाला इजा पोहोचू नये व गर्भाशयाचे तोंड उघडे असल्याने रुग्णाला जंतू प्रादुर्भावाचा धोका होऊ नये म्हणून टाका काढला व त्यांचा २४ तासांत नैसर्गिकरीत्या गर्भपात झाला. प्रथम पेशंट वाचविण्यासाठी प्रयत्न केला व नैसर्गिक गर्भपात झाला. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीस मी तयार आहे.
- डॉ. प्रवीण हेंद्रे (रंगनाथ हॉस्पिटल)
आरोग्याधिकाऱ्यांचे कानावर हात..
डॉ हेंद्रे यांच्या मतांनुसार हा नैसर्गिक गर्भपात आहे. त्यामुळे त्यात तथ्य आहे का व महापालिकेने केलेल्या चौकशीमध्ये नेमके काय तथ्य आढळले याची विचारणा करण्यासाठी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सकाळी माहिती देण्यास नकार दिला. सायंकाळनंतर त्यांचा मोबाईल स्वीचआॅफ होता. अत्यंत संवेदनशील विषयावेळीही महापालिकेची यंत्रणा जबाबदारीने नेमकी माहिती देत नसल्याचा अनुभव त्यामुळे आला.
गर्भपातप्रकरणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी आमच्याकडे अहवाल पाठविला होता. तो पाहिला असता त्यामध्ये गर्भपात झाला की नाही याचा स्पष्ट उल्लेख नाही, यासह काही त्रुटी आढळल्याने तो परत पाठविला आहे. त्रुटी दुरुस्त करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये गर्भपात झाल्याचा स्पष्ट उल्लेख असल्यास त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करू.
- अरविंद चौधरी,
पोलीस निरीक्षक (शाहूपुरी)