जगण्याच्या उमेदीने तिचे डोळे लुकलुकताहेत

By admin | Published: March 11, 2017 11:15 PM2017-03-11T23:15:24+5:302017-03-11T23:15:24+5:30

हुंबरवाडीच्या रेश्माची गंभीर कहाणी : मेरीटमधील विद्यार्थिनी तीन महिने कोमात

Her eyes are glowing with the hope of survival | जगण्याच्या उमेदीने तिचे डोळे लुकलुकताहेत

जगण्याच्या उमेदीने तिचे डोळे लुकलुकताहेत

Next

बाबासाहेब परीट --बिळाशी -घरी पिढ्यान्पिढ्याची गरिबी, आई बापाच्या पदरी तीन पोरी. पाय फुटल्यापासून त्यांचे धावणे सुरुच. कधी पोटासाठी... कधी शिक्षणासाठी... तर कधी स्वप्नांसाठी... प्रत्येक वर्गात पहिली! दहावीला मेरिटमध्ये, बारावीला केंद्रात पहिली! महाविद्यालयातही उत्तम गुण मिळवून अधिकारी होण्याची स्वप्नं पाहून त्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या लेकीच्या स्वप्नांना एकाएकी सुरुंग लागला. लाल दिव्याची स्वप्ने बघणारी रेश्मा ही कळी फुलण्याआधीच कोमेजली. गेले तीन महिने ती कोमात आहे. जगण्याच्या आणि जिंकण्याच्या उमेदीने तिचे डोळे लुकलुकताहेत आणि उद्याचे भविष्य पाहताहेत.
बिळाशीपासून उत्तरेला दुरंडेवाडी (ता. शिराळा) त्या पलीकडे हुंबरवाडी पाच-पंचवीस घरांची वस्ती. येथे रस्ता नाही. पावसाळ्यात पाण्यातूनच ये-जा करावी लागते. पूर्ण आडवळणी डोंगराच्या पायथ्याला. तेथीलच २० वर्षांची रेश्मा संजय शिंदे पहाटे उजाडण्याआधीच अंधारात जाणारी, पहिली गाडी चुकू नये म्हणून दररोज चालत रहायची. दहावीला ७० टक्के गुण मिळवून तब्बल शेवटचे वर्ष पूर्ण करुन शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्राची व यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची इंग्रजीची पदवी घेऊन बाहेर पडायचे, त्याचवेळी दहावीपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन अधिकारी व्हायचं स्वप्न तिने बघितले होते.
ठरवून अभ्यास करणारी, शाळेपासूनच उत्तम भाषण करणारी, चांगली रांगोळी काढणारी लेक गेल्या सहा महिन्यात तीनवेळा आजारी पडली. एकदा टायफॉईड, पुन्हा डेंग्यू आणि त्यानंतर पुन्हा टायफॉईड झाला. औषधोपचार सुरु असतानाच एक दिवस ताप वाढला. त्याचा परिणाम मेंदूवर झाला. अन् चालती बोलती पोरगी कोमात गेली. मुंबईत सामान्य कामे करुन पोटाला चिमटा देऊन पोरीच्या शिक्षणाला पैसे पाठवणाऱ्या बापाने मुंबई सोडून गाव गाठले. आई आशा वर्कर म्हणून काम बघते. तीही या मुलीच्या जिवासाठी धडपडते. छोटे घर, पंधरा गुंठे जमीन आणि तिही लेकीसाठी विक्री करण्यात आली. सध्या आता त्यांच्याकडे विकायलाही काही नाही. या सगळ्या व्यापामध्ये त्यांच्या जगण्याकडे दुर्लक्ष तर झाले आहेच, पण पोरीच्या जिवाचा घोर कायम लागला आहे.


लेकीसाठी नेकीनं मदत करूया..!
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज केलाय, पण अद्याप पैसे जमा नाहीत. तीन महिने अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. इस्लामपुरातून तिला मुंबईला हलवावे लागणार आहे. तिला जगून अधिकारी व्हायचं, पण त्यासाठी ती जगायला हवी ना? औषधोपचारासाठी तिला मोठ्या रकमेची गरज आहे. समाजातल्या दानशुरांनी सरळपणे मदत केली तर, एक कळी फुलणार आहे. एका लेकीसाठी सर्वांनी नेकीने मदत करुया. कोण्या एकाचे लाख नको, तर प्रत्येकाची लाखमोलाची मदत हवीय.

Web Title: Her eyes are glowing with the hope of survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.