५४व्या वर्षी तिची यशाला गवसणी
By admin | Published: June 16, 2015 01:01 AM2015-06-16T01:01:00+5:302015-06-16T01:14:11+5:30
जिद्दीची कहानी : यड्राव येथील छाया शिंदे दहावीची परीक्षा उत्तीर्ण
दगडू कांबळे - अब्दुललाट -घरातील सर्वजण उच्च शिक्षित, नोकरदार, सुशिक्षित वातावरण, मग आपणच मागे कसे.. आपण ही आता शिकायचे... शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेच्या बळावर दहावीच्या परीक्षेत ५० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. या यशाबद्दल या विद्यार्थिनीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष बाब म्हणजे या विद्यार्थिनीचे वय आहे ५४ वर्षे, वयाच्या ५४ व्या वर्षी छाया शिंदे यांनी दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण देखील झाल्या.
यश हे नुसतेच मिळत नाही. त्याला साथ हवी असते जिद्दीची, चिकाटीची आणि प्रचंड मेहनतीची. या सर्व गोष्टी ज्यांच्या अंगात आहेत, त्यास तुमच्या ध्येयापासून कोणी थांबवू शकत नाही. असंच काहीतरी यड्राव (ता. शिरोळ) येथे राहणाऱ्या, पण नोकरीसाठी अब्दुललाट येथे कार्यरत असणाऱ्या छाया बाजीराव शिंदे यांच्याबाबत म्हणावे लागेल.
छाया शिंदे यांनी छाया काळू पोवार या नावाने दहावीची परीक्षा दिली होती. नाईट कॉलेज इचलकरंजी या शाळेच्या त्या विद्यार्थिनी आहेत. त्यांचा विवाह १९८० साली झाला. शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या अब्दुललाट येथील प्रशिक्षक अंगणवाडी क्रं. १६६ येथे मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. विवाहापूर्वी त्यांचे शिक्षण सहावीपर्यंत झाले होते. विवाहानंतर त्यांची शाळा शिकण्याची इच्छा अधुरी राहिली होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी २००९ साली नाईट हायस्कूल येथे प्रवेश घेतला. सर्वच इयत्ता पास होत यावर्षीची दहावीची परीक्षाही दिली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्या पासही झाल्या. पास झाल्याचा आनंद त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना गगनात मावेनासा झाला.
शाळा, अभ्यास व परीक्षा या अग्निदिव्यातून जाण्यासाठी त्यांचे पती बाजीराव शिंदे यांनी मोलाची साथ दिली. छाया शिंदे यांना पती, दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा सुशिक्षित परिवार आहे. हा सगळा कौटुंबिक व्याप सांभाळून त्यांनी वयाच्या ५४व्या वर्षी मिळविलेले यश इतरांना निश्चितच प्रोत्साहन देणारे आहे.
घरात सर्वजण शिक्षित
छाया शिंदे यांचे पती भारतीय स्टेट बँकेत कर्मचारी आहेत. तर मोठा मुलगा आदर्श इचलकरंजीच्या एका बँकेत व्यवस्थापक, तर अमोल हा मुलगा दूध संस्थेत कामाला आहे. त्यांच्या सुनादेखील पदवीधर आहेत.
अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाची नेहमी खंत वाटायची. शिक्षण पूर्ण करण्याचे ध्येय होते. पती, मुलांच्या प्रेरणेमुळे दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्णदेखील झाले. पुढेदेखील शिकण्याची इच्छा आहे.
- छाया शिंदे