सादळे मादळे शिवारात शिरला १४ गव्यांचा कळप, शेतीचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 11:27 PM2023-04-09T23:27:30+5:302023-04-09T23:28:17+5:30
हा गव्यांचा कळप दिवसा व रात्री सादळे मादळे, मनपाडळे शिवारात धुडगूस घालून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांवर डल्ला मारुन फस्त करत आहेत.
सतीश पाटील
शिरोली : मादळे (ता.करवीर) येथील कोरवी आणि दर्गा शेत शिवारात चौदा गव्यांच्या कळप आला असून तो रविवारी सकाळी ९ वाजता शेतकरयांना नजरेस पडला. सादळे मादळे येथील जंगलात कोरवी आणि दर्गा शेत शिवारात, रस्त्यावर गव्यांचा बोलबाला असुन रविवारी सकाळी नऊच्या सुमारास १४ गव्यांचा कळप मनपाडळे डोंगरातून जोतिबा टोप मुख्य रस्ता पार करून कोरवी यांच्या शेता नजिकच्या कुरुण शेतातुन पोहाळे गावच्या दिशेने झाडी मध्ये गेला. यामध्ये पूर्ण वाढ झालेले ११ तर ३ लहान पिलांचा समावेश आहे. हा गव्यांचा कळप दिवसा व रात्री सादळे मादळे, मनपाडळे शिवारात धुडगूस घालून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांवर डल्ला मारुन फस्त करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून १४ गव्यांच्या कळप गिरोली, सादळे मादळे, भुयेवाडी, कासारवाडी, मनपाडळे, पाडळी, अंबपवाडी जंगल परिसरात तळ ठोकुन आहे. कडक उन्हाळा सुरू असल्यानं पाणी आणि हिरव्या चाऱ्यांच्या शोधत गव्यांनी आपला मोर्चा शिवारातील ओल्या पिकांकडे वळवला आहे. या परिसरात हिरवा उस, ज्वारी, मका, हि पिक खायला मिळतात, मनपाडळे चा तलाव, भुयेवाडी तलाव मुबलक पाणी असल्याने हे गवे येथेच ठाण मांडून आहेत. या गव्यांकडुन गेल्या महिनाभरापासून सादळे मादळे शिवारात धुडगूस सुरू असून मादळे येथील दिलिप कोरवी, प्रविण कोरवी ,तुकाराम पोवार, कमल पोवार, महिपती पोवार, अमित पोवार, मुमताज पटेल, शंकर पोवार यांच्या सह अन्य शेतकऱ्यांच्या उस, मका, ज्वारी आदी पिकांचे या गव्यांनी मोठे नुकसान केले आहे. सध्या दिवसा व रात्री शिवारात गव्यांचा धुडगूस सुरू असून रात्री अपरात्री शेत शिवारात, गावाबाहेर इतरत्र एकटे जाणं मुश्किल बनलं आहे. वनविभागाने शेतकरयांना पिकांची नुकसान भरपाई तातडीने देऊन गव्यांना नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.