सोशल मीडियाच्या युगातही इथे वृत्तपत्र विक्रेत्यांची सेवा इमाने इतबारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:23 AM2019-08-02T00:23:36+5:302019-08-02T00:52:26+5:30
वृत्तपत्राची सुरुवात झाल्यापासून ते पोहोचविणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘वृत्तपत्र विक्रेता’ होय. साधने कितीही बदलली, तरी या व्यवसायाचे स्वरूप काही बदलले नाही; कारण वृत्तपत्र पहाटे सहाच्या आत पोहोचलेच पाहिजे. अन्यथा
कोल्हापूर : गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस पडत आहे, अशा कसोटीच्या काळातही सर्वसामान्यांच्या घरात पावसात न भिजलेले कोरडे आणि तेही सकाळी वेळेत वृत्तपत्र हातात मिळत आहे; मात्र त्यामागची मेहनत बघितली तर अनेकांना आपले जीवन किती सुखी आहे. याची जाणीव होईल. ही सर्व अपार मेहनत घेणाऱ्या त्या ‘वृत्तपत्र विक्रेत्या’विषयी थोडसं...
वृत्तपत्राची सुरुवात झाल्यापासून ते पोहोचविणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘वृत्तपत्र विक्रेता’ होय. साधने कितीही बदलली, तरी या व्यवसायाचे स्वरूप काही बदलले नाही; कारण वृत्तपत्र पहाटे सहाच्या आत पोहोचलेच पाहिजे. अन्यथा नागरिकांची आरडाओरड होते. विशेषत: पावसाळ्यात कितीही धो-धो पाऊस असो, त्यात पहाटे तीन वाजता उठून ठरलेल्या डेपोवरून वृत्तपत्रांचा गठ्ठा घेणे, तेथून त्याचे वर्गीकरण करणे. कुणाला कुठले वृत्तपत्र टाकायचे, ठरलेल्या क्षेत्रात पहाटेपासून ते घराच्या दारापर्यंत अलगद पोहोचविणे, पावसाळ्यात तर वृत्तपत्र भिजून आलेले वाचकांना अजिबात चालत नाही; त्यामुळे एखाद्यावेळी चुकून ते भिजलेच तर दुसºया दिवशी वाचकाची ओरड ही ठरलेलीच असते. सर्वसामान्यांना दररोज पहाटे तीन वाजता नुसते फेरफटका मारण्यासाठी हजार रुपये देतो म्हटले तरी अनेकजण नाही असेच उत्तर देतील; मात्र नियमित बाराही महिने वृत्तपत्र विक्री करणारी मंडळी आपली सेवा इमाने इतबारे करतात; त्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य वर्गाला जगात काय चालले आहे, याची खरी माहिती पोहोचते.
आजच्या इंटरनेटच्या जमान्यात वृत्तपत्रावरील विश्वास आणखी दृढ होत चालला आहे.
कारण इंटरनेट, सोशल मीडियाच्या युगात कुठल्या माहितीवर विश्वास ठेवायचा अन् कुठल्या नाही, अशी स्थिती सर्वसामान्यांची झाली आहे. गल्लीच्या कानाकोपºयातील भांडणे ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंतची बातमी वृत्तपत्र विक्रेते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवित असतात; त्यामुळे आजच्या धावत्या जगातही या मंडळींचे महत्त्व अधोरेखित आहे.
३ वाजता सुरू होतो दिवस
शहरासह जिल्ह्यात सुमारे हजाराहून अधिक मंडळी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. अनेकांचा चरितार्थ या व्यवसायावर सुरू आहे. शहरातील भाऊसिंगजी रोडवरील जुन्या मराठा बँकेजवळ, संभाजीनगरातील पेट्रोल पंपाशेजारील इंदिरा सागर हॉल, राजारामपुरी जनता बझारजवळ, कावळा नाका येथील गीता मंदिरजवळ पहाटे तीन वाजल्यापासून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामाची सुरुवात होते.
धो-धो पावसातही काळजी घेऊन कोरडे वृत्तपत्र पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. कधीतरी नकळत भिजतो. यावेळी वाचकांनी समजून घ्यावे.
- राजू पाटील, राजारामपुरी डेपो
भटकी कुत्री, सायकल पंक्चर होणे, पेपर पावसात भिजू नये म्हणून थेट गेट उघडून दारापर्यंत नेऊन कडीला अडकविण्याने थोडा वेळ होतो.
- चंदू सूर्यवंशी, वृत्तपत्र विक्रेता, भाऊसिंगजी रोड डेपो.
गेटवर प्लास्टिकची नळी लावण्याची सूचना देऊनही ती लावत नाहीत. पावसाळ्यात तरी सहकार्य अपेक्षित आहे.
- नामदेव गोंधळी, संभाजीनगर डेपो