इथं दिली जाते रुग्णांना जगण्याची उमेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:50+5:302021-06-03T04:17:50+5:30
सरदार चौगुले लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : कोरोना रोगापेक्षा त्याच्या भीतीनेच अनेकांचा जीव टांगणीला लागलाय. परंतु कोरोना ...
सरदार चौगुले
लोकमत न्यूज नेटवर्क
पोर्ले तर्फ ठाणे : कोरोना रोगापेक्षा त्याच्या भीतीनेच अनेकांचा जीव टांगणीला लागलाय. परंतु कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान धीर देत त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण केली तर कोरोना रुग्ण बरा होतो, असे अनेक कथित अनुभव पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे कोविड सेंटरमधील रुग्णांना उपचारादरम्यान येत आहेत. कोविड सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि वार्डबाॅय मनापासून रुग्णांची सेवा करत आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे रुग्ण आणि नातेवाइकांच्यातून भावना व्यक्त होत आहे.
मरणयातना देणाऱ्या कोरोना रोगाच्या भीतीने ग्रामीण भागातील रुग्ण अंगावर काढत असल्याने एकमेकांच्या संपर्काने रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची परिस्थिती गंभीर झाली की, त्याला उपचारासाठी दाखल केले जात असल्याने परिस्थिती हातबाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळे घरी राहून अंगावर काढणे रुग्णांच्या जीव टांगणीला लागल्यासारखे आहे. रुग्णांची परिस्थिती पाहून वैद्यकीय अधिकारी त्यांना समुपदेशन करतात. त्यांच्या प्रकृतीनुसार त्याचे कोठे कसे अलगीकरण करावयाचे यांची माहिती चांगली मिळत असल्याने रुग्णांचे आत्मविश्वास वाढवून गरजेनुसार औषधोपचार दिला जात आहे. कोल्हापूरचे नुरमहंमह इमामसाहेब शेख (वय ६५) यांना मधुमेह असल्याने अगदी दिवसांतून आस्थेने त्याची साखर तपासणी करून इन्सुलिन दिले जात आहे. त्यांना कधी तक्रारीची संधी येऊ दिली नाही. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही पाॅझिटिव्ह आहे. नावली-धारवाडी राजाराम जाधव (वय ७५) यांची पत्नी कोरोनात बरी होऊन घरी गेली; परंतु त्यांच्यामुळे पती कोरोना झाला. अर्धांगवायू आणि ॲाक्सिजन पातळी कमी झाल्याने चिंताजनक प्रकृती असलेल्या जाधव यांच्या उपचार करून जगण्याची नवी उमेद निर्माण केली.
कोडोली येथील वसंत चंद्राप्पा महापुरे (वय ७०) यांची ॲाक्सिजन पातळी कमी आणि एचआरसीटी स्कोर वाढलेला असताना त्यांना डाॅक्टर आणि नर्स यांनी धीर देऊन त्यांच्यात जगण्याचे बळ निर्माण करीत आहेत. दिवसातून तीन वेळा ताप, ॲाक्सिजन तपासणी केली जात आहे. तर वार्डबाॅय आणि नर्स यांच्याकडून रुग्णांनी गोळ्या घेतल्यात की नाही, संपल्या असतील तर नवीन गोळ्यांचा डोस दिला जाऊन रुग्णांची आपुलकीने चौकशी केली जात आहे.
बेडची संख्या वाढवावी
खासगीपेक्षा सरकारीमध्ये रुग्णांची उपचार घेण्याची मानसिकता जादा आहे; परंतु रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारी कोविड सेंटर उपचारासाठी कमी पडत आहेत. रुग्णांची परिस्थिती पाहून त्यांना सीपीआर किंवा खासगी दवाखान्यात पुढील उपचाराचा सल्ला दिला जातो. खासगीतील खर्च न परवडणारा नाही, शिवाय लुटीच्या धंद्यात रुग्णांची शाश्वती नाही. तर सीपीआरला गरजेवेळी बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे गरिबांना सरकारी कोविड सेंटरचा आधार महत्त्वाचा असल्याने सरकारी कोविड सेंटरमध्ये ॲाक्सिजन बेड आणि इतर बेडची संख्या वाढवावी, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.