मद्य व्यावसायिकांची ‘दादां’कडे धाव
By admin | Published: April 4, 2017 01:44 AM2017-04-04T01:44:19+5:302017-04-04T01:44:19+5:30
कायदेशीर मार्ग काढण्याची विनंती : ‘ते’ रस्ते स्थलांतरित करण्याचा पर्याय शक्य
कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद झालेल्या शहरातील व ग्रामीण भागातील मद्यविक्रेते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. जे रस्ते २००१ नंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाकडे नव्हते, ते महानगरपालिकेकडे स्थलांतरित करण्याचे तांत्रिकदृट्या राहून गेले असे रस्ते महानगरपालिकेने देखभालीसाठी घेण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्यास त्या मार्गावरील मद्यालये पूर्ववत सुरू करण्याबाबतच्या निर्णयातून कायदेशीर मार्ग निघू शकेल, असा पर्याय चर्चेत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुचविला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे ५०० मीटर अंतरावरील सर्व बीअरबार परमीट रुम, बीअर शॉपी, वॉईन्स शॉप, देशी दारू दुकाने बंद झाली. यामुळे कोल्हापूर शहरातील सुमारे २१० पैकी १६१ मद्यालये शनिवारी बंद झाली.
मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाची, पण देखभाल महानगरपालिकेकडे असे शहरातून जाणारे रस्ते या नियमातून वगळावेत यासाठी विविध मद्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी धावाधाव करून महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेतली. पण, प्रत्येक अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे बोट दाखविले. सायंकाळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी चर्चेत जळगाव, जालना, नाशिक, लातूर, यवतमाळ येथील शहरांतून जाणारे राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आला असून, तसे झाल्यास कायदेशीर बाबीतून सुटका होऊन शहरातील मद्यालये सुरूराहण्यास अडचणी येणार नसल्याचे चर्चेत मंत्री चंद्रकांतदादांना पटवून दिले. या चर्चेत चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, सुनील मोदी, हरिदास सोनवणे, अरुण चोपदार, चंद्रकांत जाधव, कुमार सोनवणे,आदी सहभागी झाले होते. रस्ते महापालिकेकडे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी दिल्यास त्यावर जिल्हाधिकारी व त्यानंतर मुख्य सचिव यांच्यामार्फत प्रस्ताव आल्यास त्यावर सही करू,असेहीचंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
पाच लाख बेरोजगार होतील
राज्यातील दहा हजार मद्यालये बंद केल्यास त्यावर आधारित असणारे सुमारे पाच लाख लोक बेरोजगार होतील, तसेच अधिकृत ठिकाणी दारू न मिळाल्याने अनधिकृत ठिकाणी दारूपिण्याचे प्रमाण वाढेल. बेकायदेशीरपणे दारूची विक्री वाढण्याची शक्यताही मंत्री चंद्रकांतदादा यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांशी उद्या मुंबईत चर्चा
याप्रश्नी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार हे तिघे उद्या, बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्याबाबत या तिघांचीही फोनवर चर्चा झाल्याचे समजते.