अरे, उसकी बॅटरी उतरी... हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:55 PM2018-05-12T22:55:18+5:302018-05-12T22:55:18+5:30

काशी पैलवानबरोबरची लढत माझ्या पैलवानकीच्या वाटचालीत महत्त्वाची ठरली. या कुस्तीने मला मानसन्मान दिला. पैसाही दिला आणि खऱ्या अर्थाने ‘मल्ल’ म्हणून मला स्वतंत्र ओळख दिली...

 Hey, his battery got off ... life story of Hindakesari Dinanath Singh | अरे, उसकी बॅटरी उतरी... हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी

अरे, उसकी बॅटरी उतरी... हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी

Next

काशी पैलवानबरोबरची लढत माझ्या पैलवानकीच्या वाटचालीत महत्त्वाची ठरली. या कुस्तीने मला मानसन्मान दिला. पैसाही दिला आणि खऱ्या अर्थाने ‘मल्ल’ म्हणून मला स्वतंत्र ओळख दिली...

उत्तर प्रदेशच्या काशी यादव व माझ्यातील लढतीची उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचली होती आणि कुस्तीचा प्रत्यक्ष क्षण समोर ठाकला होता. मैदान खचाखच भरले होते. आम्ही सिंह म्हणजे क्षत्रिय-ठाकूर समाज व ते काशी हे यादव समाजाचे. त्यामुळे आम्हा मल्लांइतकीच किंबहुना त्याहून जास्त ईर्ष्या आमच्या समर्थकांमध्ये होती. पंचांनी दोन्ही मल्लांना आखाड्याच्या मध्यभागी उभे केले व काही आवश्यक सूचना केल्या. कुस्ती निकाली करणे ही तर कुस्तीची पहिली अटच होती. दोन्ही मल्लांचे हस्तांदोलन झाले व खडाखडी सुरू झाली. काशी यादवच्या तुलनेत मी तसा नवखा मल्ल. त्यामुळे ‘मला जाता-जाता चितपट करू,’ असा आत्मविश्वास त्याच्या चेहºयावर दिसत होता. मी नवीन पैलवान असल्यामुळे अत्यंत जोषामध्ये होतो; परंतु तो अत्यंत सावध होता व डोक्याने कुस्ती करत होता. मी जर आता काशी यादवला चितपट केले तर माझे नाव होणार, समाजात मानसन्मान मिळणार, असे मला मनोमनी वाटत होते. मनात असे द्वंद्व सुरू असतानाच ही कुस्ती सुरू होती. सुरुवातीची १५ मिनिटे खडाखडीत व एकमेकांची ताकद आजमावण्यात गेली. त्यानंतर कुस्ती जिंकण्याच्या दृष्टीने डावपेच सुरू झाले. तोपर्यंत परस्परांना लढतीचा चांगलाच अंदाज आला होता. कुस्तीने आता वेग घेतला होता. दोन्ही मल्ल परस्परांना भिडण्याचा व समोरच्याला चितपट करण्याच्या प्रयत्नात होते. घामाने अंग गळत होते. मातीमुळे अंगाचा चिखल झाला होता. एक जोरदार पकड झाल्यावर कुस्ती सुटली... इतक्यात मैदानातून सारदासिंग बसाँव यांचा आवाज माझ्या कानांवर पडला. ते मोठ्याने ‘अरे... उसकी बॅटरी उतरी...’ असे म्हणाले म्हणून मी काशीकडे सहज नजर टाकली तर त्याने एक दीर्घ श्वास घेतल्याचे मला जाणवले. ‘समजनेवालोंको इशारा काफी है...’ संधी चालून आली होती. आता वेळ दवडण्यात किंवा नुसतीच खडाखडी करण्यात मतलब नव्हता. मी तो क्षण जाणला व चढाई केली...त्याला ‘ढाक’ मारल्यावर खाली बसला तो चितपटच झाला. कुस्ती निकाली झाल्याचे समजताच प्रचंड जल्लोष झाला. लोकांनी मैदानात येऊन मला उचलून घेतले. तेव्हा कुस्ती जिंकल्यावर मल्लांना पुष्पहार घालायची पद्धत नव्हती. त्याऐवजी बक्षीस म्हणून प्रत्येकजण किमान एक रुपया द्यायचा. त्या काळी रुपयाला सव्वा लिटर दूध यायचे. त्यामुळे पैलवानाच्या दृष्टीने या रुपयाचे मोल वेगळेच होते. मैदानातच माझ्या अशा एक-दोन रुपयांनी दोन चादरी भरल्या.
या कुस्तीने मला आयुष्यात अनेक गोष्टी मिळवून दिल्या. मी पैलवानकीच्या लाईनवर आलो. आमच्याकडील उत्तर भारतीय लोकांना मी जरी ‘महाराष्ट्र केसरी’ झालो तरी त्याचे फार महत्त्व वाटत नसे; कारण ‘महाराष्ट्र केसरी’चे वलय हे महाराष्ट्रापुरतेच आहे. तोपर्यंत आमच्याकडील लोक ज्या माझ्या मुंबईत व महाराष्ट्रातही ज्या लढती झाल्या, त्या पाहायला एवढ्या मोठ्या संख्येने येत नसत. ही लढत म्हणजे आमच्या गावात झाल्यासारखी होती. तिथे गावाचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे जेव्हा मी काशीला ‘पटक दिया’ हे समजले तेव्हा बिरादरी व उत्तर प्रदेशनेही मला ‘पैलवान’ म्हणून मान्यता दिली. माझ्या दृष्टीने काशी पैलवानबरोबरची ही लढत म्हणजे माझ्या पैलवानकीच्या वाटचालीतील महत्त्वाची लढत ठरली. या कुस्तीने मला मोठी इज्जत दिली, मानसन्मान दिला. पैसाही दिला आणि खºया अर्थाने ‘मल्ल’ म्हणून मला स्वतंत्र ओळख दिली. या लढतीनंतर मी कधी मागे वळून बघितले नाही. माझ्या कुस्तीच्या वाटचालीतील हे मैदान म्हणजे ‘मैलाचा दगड’ ठरले. आजही ही लढत आठवताना माझ्या अंगावर शहारे येतातच; पण आपण ती कुस्ती जिंकल्याचा क्षण आठवला की अंगावर मूठभर मांस चढल्याची अनुभूती येते. प्रत्येकाच्या आयुष्यात कलाटणी देणारे असे काही क्षण असतात. त्या कुस्तीचे रोख बक्षीस फार काही होते असे नाही; परंतु त्या विजयाने जे मला मिळवून दिले ते आजअखेर माझ्या मनाच्या कुपीत साठवून ठेवले आहे. माझ्या ‘हिंदकेसरी’च्या वाटचालीतील हे पहिले पाऊल होते. आता पुढचा पल्ला मोठा होता. वाटही आव्हानात्मक होती; परंतु या लढतीने जो एक आत्मविश्वास दिला तो जीवनात मल्ल म्हणून यशस्वी होण्यास कारणीभूत ठरला, असे म्हटले तर वावगे ठरू नये...! ‘जय काशी पैलवान...’!
- शब्दांकन : विश्वास पाटील


 

Web Title:  Hey, his battery got off ... life story of Hindakesari Dinanath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.