डॉल्बी लावण्यासाठी मंडळांची छुपी तयारी
By admin | Published: September 12, 2016 12:42 AM2016-09-12T00:42:07+5:302016-09-12T00:42:07+5:30
पोलिसांची करडी नजर : मंडळांवर जाग्यावर कारवाई - राणे
कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावण्यासाठी शहरातील काही मंडळांनी आतापासूनच छुपी तयारी केली आहे. मिरवणुकीत ऐनवेळी ते डॉल्बी घेऊन येणार आहेत. या छुप्या हालचालींची चाहुल पोलिस प्रशासनाला लागली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर जाग्यावरच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या कारवाईमध्ये डॉल्बीचा वापर करणाऱ्या चालक, मालक, मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व ज्या वाहनांवर डॉल्बी यंत्रणा ठेवण्यात आली आहे, त्या वाहनांचे चालक, मालक, आदींचा समावेश असेल, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी रविवारी दिली.
डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार जिल्हा पोलिस प्रशासनाने केला आहे. सार्वजनिक तरुण मंडळांची बैठक घेऊन, नियम डावलून डॉल्बी लावणाऱ्या तरुण मंडळांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पोलिस प्रशासनाने केली होती. तसेच प्रत्येक मंडळाला लेखी नोटीसही बजाविण्यात आली आहे. निवासी परिसरात ६० डेसिबल इतक्या आवाजाची मर्यादा मंडळांना घालून दिली आहे. तसेच डॉल्बी लावल्याने मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांचे प्रबोधनही केले आहे; परंतु, काही मंडळांनी सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावण्याची छुपी तयारी केली आहे. याची चाहुल पोलिस प्रशासनाला लागली आहे. शहर पोलिस उपअधीक्षक राणे यांनी डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर जाग्यावरच कारवाई करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शहरातील पाचही पोलिस ठाण्यांना कारवाईचे आदेश दिले.
गुन्हे शाखेची बैठक
सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी शहरात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरट्यांचा वावर वाढणार आहे. तसेच युवती व महिलांची छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी व राजारामपुरी पोलिस ठाण्यांच्या गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची विशेष बैठक पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात घेतली. यावेळी त्यांनी पोलिस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.