कोल्हापूर परिक्षेत्रात ‘हाय अलर्ट’ - विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:11 AM2019-02-28T00:11:32+5:302019-02-28T00:12:17+5:30
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावामुळे पाचही जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’ राहण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना बुधवारी दिले. त्यानुसार प्रसिद्ध धार्मिक स्थळांभोवती सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोल्हापूर : भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावामुळे पाचही जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’ राहण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना बुधवारी दिले. त्यानुसार प्रसिद्ध धार्मिक स्थळांभोवती सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी बुधवारी रात्री सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराची सुरक्षाही वाढविण्यात आली.
काश्मीरमधील जवानांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्टÑात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार बुधवारी पहाटेपासून कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाचही जिल्ह्यांतील सीमारेषेसह प्रत्येक नाक्यावर व चौकांत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. अंबाबाई मंदिरात नेहमीच्या सुरक्षेमध्ये वाढ करून सशस्त्र पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज, बुधवारी नवे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके पदभार स्वीकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बॉम्ब शोधक पथकाकडून अंबाबाई मंदिराची पाहणी
बुधवारी पोलीस प्रशासनाकडून कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील सुरक्षा यंत्रणांची तपासणी करण्यात आली. मंदिराचे चारही दरवाजे, गाभारा, सीसीटीव्ही यंत्रणांची तपासणी केल्यानंतर पोलीस आणि देवस्थान कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध सध्या तणावपूर्ण बनले आहेत. याचाच परिणाम म्हणून देशातील सर्व संवेदनशील स्थळे, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे; त्यामुळे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवरील अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेतही वाढ केली आहे. गुरुवारी दुपारी पोलीस प्रशासनाकडून हॅण्ड मेटल डिटेक्टर, डोअर मेटल डिटेक्टर, मंदिराच्या चारही बाजूंच्या सुरक्षिततेची पाहणी करण्यात आली. तसेच श्वानाच्या सहाय्याने मंदिराचा प्रत्येक कोपरा तपासण्यात आला. बॉम्बरोधक पथकालाही योग्य त्या सूचना देण्यात आल्या. पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने चारही गेटवर सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष येथून कॅमेऱ्याची तपासणी केली. तसेच गेटवरील सुरक्षारक्षकांना प्रत्येक व्यक्तीच्या हालचाली टिपण्याच्या, तसेच वस्तू तपासण्याच्या सूचना करण्यात आल्या.
भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा यंत्रणांची पाहणी करण्यात आली. बॉम्बरोधक पथकांने बारकाईने मंदिराची तपासणी केली.