रितू लालवाणी अपात्रतेला उच्च न्यायालयाची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:26+5:302021-07-21T04:17:26+5:30
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील गांधीनगरच्या लोकनियुक्त सरपंच रितू लालवाणी यांना अपात्र ठरवण्याच्या विभागीय आयुक्तांच्या ...
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील गांधीनगरच्या लोकनियुक्त सरपंच रितू लालवाणी यांना अपात्र ठरवण्याच्या विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यांना पदावरून कमी करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या आदेशास मंगळवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. लालवाणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात न्या. एम.एस. कर्णिक यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.
गांधीनगरच्या सरपंच रितू लालवाणी यांनी अपंगाचा खोटा दाखला काढणे, बेकायदेशीर बांधकामाकडे दुर्लक्ष करून त्यावर कारवाई न करणे, यासह इतर कारणावरून त्यांना ग्रामपंचायत अधिनियमांतील तरतुदीप्रमाणे पदावरून काढून टाकावे, असा अर्ज ग्रामस्थ सनी चंदवानी यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केला होता. २९ जूनच्या आदेशान्वये लालवाणी यांना अपात्र ठरवण्यात आले होते.
याबाबत लालवाणी यांनी राज्य शासनाकडे धाव घेऊन अपील दाखल केले; परंतु सध्या मंत्रालयात कोविड-१९ च्या निर्बंधांमुळे सुनावण्या होत
नसल्याने त्यांनी ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. ही सुनावणी ग्रामविकासमंत्र्यांसमोर घेण्याची सूचना न्यायालयाने केली आणि तोपर्यंत अपात्रतेस स्थगिती दिली.