हाय व्होल्टेज सामन्यात ‘पाटाकडील’ची ‘शिवाजी’ वर मात ; ‘संध्यामठ’ने ‘पोलीस’ला बरोबरीत रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:47 AM2018-11-29T11:47:21+5:302018-11-29T11:49:25+5:30

के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळाचा १-० असा पराभव केला; तर कोल्हापूर पोलीस संघ व संध्यामठ तरुण मंडळ

In the high voltage match, 'Patan' defeats 'Shivaji'; 'Sandhyamath' stopped the 'Police' | हाय व्होल्टेज सामन्यात ‘पाटाकडील’ची ‘शिवाजी’ वर मात ; ‘संध्यामठ’ने ‘पोलीस’ला बरोबरीत रोखले

हाय व्होल्टेज सामन्यात ‘पाटाकडील’ची ‘शिवाजी’ वर मात ; ‘संध्यामठ’ने ‘पोलीस’ला बरोबरीत रोखले

Next
ठळक मुद्दे के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धापाटाकडील-शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी सुमारे दहा हजारांहून अधिक प्रेक्षकांनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गर्दी केली होती.

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळाचा १-० असा पराभव केला; तर कोल्हापूर पोलीस संघ व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यातील लढत २-२ अशी बरोबरीत राहिली.

शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पाटाकडील व शिवाजी तरुण मंडळ या दोन पारंपरिक संघांत लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांकडून आक्रमक व वेगवान खेळांचे प्रदर्शन केले गेले. ‘पाटाकडील’कडून जॉन्सन, ओंकार पाटील, वृषभ ढेरे, ओंकार पाटील, सौरभ सालपे ,डेव्हिड इथो यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले; तर ‘शिवाजी’कडून करण चव्हाण-बंदरे, शुभम साळोखे, सुमित घाटगे, सुमित जाधव, तांबा यांनीही तितक्याच तोडीचा खेळ करीत स्पर्धेत चांगलीच रंगत आणली. दोन्ही संघांना प्रेक्षकांतून समर्थन लाभले होते.

पाटाकडील ‘अ’ कडून हृषिकेश मेथे-पाटील, तर ‘शिवाजी’कडून करण चव्हाण-बंदरे यांच्या प्रत्येक चालीचे प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवून समर्थन केले. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल न करता आल्याने सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात ‘पाटाकडील’कडून हृषिकेश मेथेच्या पासवर ओंकार पाटीलने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही; तर ‘शिवाजी’कडून केनियन खेळाडू तांबाने मारलेला फटका गोलपोस्टला अडून मागे आला. त्यामुळे ही गोल करण्याची संधी वाया गेली. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना बरोबरीत राहील असे फुटबॉल रसिकांना वाटत होते. मात्र, ७४ व्या मिनिटाला अक्षय मेथे-पाटीलने जोरदार मुसंडी मारत गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ‘शिवाजी’कडून सामन्यात बरोबरी साधण्याचे अनेक प्रयत्न झाले; पण यश आले नाही. अखेरीस हा सामना पाटाकडील ‘अ’ने १-० असा जिंकला. सामन्यादरम्यान मैदानात गैरवर्तन करणाऱ्या ‘पाटाकडील’च्या रणजित विचारे या खेळाडूस पंच सुनील पोवार यांनी समज म्हणून यलो कार्ड दाखविले. तत्पूर्वी त्याला खेळामध्ये यलो कार्ड असल्याने नियमानुसार दोन यलो कार्ड झाल्यास रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.

संध्यामठ तरुण मंडळाने कोल्हापूर पोलीस संघास २-२ असे बरोबरीत रोखले. कोल्हापूर पोलीस संघाकडून २० व्या मिनिटाला इंद्रजित मोंडलने पहिला गोल नोंदविला; तर २९ व्या मिनिटाला ‘संध्यामठ’कडून रोहित पाटीलने मिळालेल्या संधीवर गोल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. उत्तरार्धात पुन्हा पोलीस संघाकडून इंद्रजित मोंडलने वैयक्तिक व संघाचा दुसरा गोल नोंदविला. ७० व्या मिनिटाला ‘संध्यामठ’कडून आशिष पाटीलने गोल करीत सामना २-२ असा बरोबरीत आणला. अखेरपर्यंत हीच गोलसंख्या कायम राहिल्याने सामना बरोबरीत सुटला.

यांना कोण आवरणार?
पाटाकडील-शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी सुमारे दहा हजारांहून अधिक प्रेक्षकांनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गर्दी केली होती. सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून पाण्याचा बाटल्या मैदानात भिरकावण्यात आल्या. तर काही प्रेक्षकांनी थेट खेळाडू व प्रशिक्षक पंचांना अश्लील शिवीगाळ, शेरेबाजी केली. निवेदक आणि पोलिसांनी वारंवार सांगूनही हा प्रकार थांबत नव्हता. त्यामुळे अशा मोजक्याच हुल्लडबाजांना कोण आवर घालणार, असा प्रश्न मैदानात फुटबॉलप्रेमींकडून विचारला जात आहे.
 

Web Title: In the high voltage match, 'Patan' defeats 'Shivaji'; 'Sandhyamath' stopped the 'Police'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.