उच्चशिक्षित कैद्यांचे पुनर्वसन करणार : सुरेंद्रनाथ पांडेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:41 PM2018-10-13T23:41:36+5:302018-10-13T23:44:22+5:30
कळंबा कारागृहातील डॉक्टर, वकील, अभियंता अशा उच्चशिक्षित कैद्यांचे शैक्षणिक पात्रतेनुसार पुनर्वसन केले जाणार आहे. महिला कैद्यांना प्रशिक्षित करून त्यांचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह व सुधार सेवा
कोल्हापूर : कळंबा कारागृहातील डॉक्टर, वकील, अभियंता अशा उच्चशिक्षित कैद्यांचे शैक्षणिक पात्रतेनुसार पुनर्वसन केले जाणार आहे. महिला कैद्यांना प्रशिक्षित करून त्यांचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह व सुधार सेवा विभागाचे पोलीस महासंचालक सुरेंद्रनाथ पांडेय यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी या कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कारागृह अधीक्षक शरद शेळके उपस्थित होते.
महाराष्टत एकूण ५२ कारागृहे आहेत. त्यांमध्ये सुरक्षित आणि उपक्रमशील म्हणून कळंबा कारागृहाचा दुसरा क्रमांक आहे. कारागृहामध्ये अकरा बरॅक आहेत. अंडा सेल स्वतंत्र आहे. या ठिकाणी बंदिस्त असलेल्या कैद्यांशी पांडेय यांनी संवाद साधला. अंबाबाई देवीचा लाडूप्रसाद बनविणाऱ्या बेकरी विभागास भेट दिली. येथे ५० महिला कैदी लाडूप्रसाद बनविण्याचे काम करतात. त्यांनी या महिलांच्या समस्या जाणून घेतला.
प्रत्येक महिलेस ४३ रुपये दिवसाला पगार दिला जातो. पगाराची रक्कम वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. कारागृह सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी काही कैद्यांनी शिक्षेत सूट मिळावी, खुल्या कारागृहात संधी द्यावी, सुट्या मिळाव्यात, अशा व्यथा पांडेय यांच्यासमोर मांडल्या. अधीक्षक शरद शेळके यांनी स्वागत केले.
कारागृहात एटीएम सुविधा
कारागृहात काम करणाºया प्रत्येक कैद्याचे पैसे त्याच्या बँक खात्यावर जमा करा. त्यांना हवे तेव्हा पैसे मिळण्यासाठी कारागृहात एटीएम सेंटर बसवा. त्यांचे पैसे घरी पाठविण्यासाठी आॅनलाईन सोय उपलब्ध करून देण्याच्या सूचना पांडेय यांनी अधीक्षक शेळके यांना दिल्या.
फाशी यार्डच्या मंजुरीची मागणी कळंबा कारागृहात फाशी यार्ड उभारण्यासाठी शासनस्तरावर २०१७ मध्ये प्रस्ताव मागविला होता. गेले वर्षभर हा प्रश्न प्रलंबित आहे. त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी कारागृह प्रशासनाच्या वतीने पांडेय यांच्याकडे करण्यात आली.
कोल्हापुरातील कळंबा कारागृहाची पाहणी शनिवारी कारागृह व सुधार सेवा विभागाचे पोलीस महासंचालक सुरेंद्रनाथ पांडेय यांनी केली. यावेळी त्यांनी महिला कैद्यांशी संवाद साधला. दुसºया छायाचित्रात सुरेंद्रनाथ पांडेय यांचे कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी स्वागत केले.