आरोग्य अधिकाऱ्यांच्या जागा जास्त, अर्जच कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:38 AM2019-12-19T11:38:40+5:302019-12-19T11:42:15+5:30
महाराष्ट्र शासनाच्यावतीने नेमण्यात येणाऱ्या ‘कम्युनिटी हेल्थ आॅफिसर’ या पदासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा निम्मेही अर्ज न आल्याचे चित्र समोर आले आहे. उलट कोल्हापूरला मात्र याच पदासाठी तिप्पट अर्ज दाखल झाले आहेत.
समीर देशपांडे
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्यावतीने नेमण्यात येणाऱ्या ‘कम्युनिटी हेल्थ आॅफिसर’ या पदासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा निम्मेही अर्ज न आल्याचे चित्र समोर आले आहे. उलट कोल्हापूरला मात्र याच पदासाठी तिप्पट अर्ज दाखल झाले आहेत.
सर्वच आरोग्य उपकेंद्रांना अशा पद्धतीचे कंत्राटी आरोग्य अधिकारी देण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला होता. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये ही भरतीप्रक्रिया पारही पडली. मात्र, महापूर, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यामुळे कोल्हापूर मंडळातील सांगली वगळता कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांची भरती प्रक्रिया झाली नव्हती.
ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. कोल्हापूरच्या ३८० जागांसाठी तिप्पट म्हणजे ९०३ अर्ज आले आहेत, तर सिंधुदुर्गसाठी २७० जागा असताना तेथे फक्त ८० डॉक्टरनी अर्ज केले आहेत. रत्नागिरीसाठी ३५० जागा असताना तेथेही फक्त १७४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
या अर्जांची सध्या कोल्हापूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये छाननी सुरू असून, त्यानंतर यातील पात्र उमेदवारांची यादी लावून याबाबत हरकती मागविण्यात येतील. त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
त्यात उत्तीर्ण झालेल्यांना सहा ते आठ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर नाशिक आरोग्य विद्यापीठाच्यावतीने प्रशिक्षणानंतर एक परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
निकष आणि मानधन
बीएएमएस किंवा बीएस्सी. (नर्सिंग) झालेले उमेदवार यासाठी पात्र असून, त्यांना दरमहा २५ हजार रुपये ठोक मानधन देण्यात येणार आहे. याशिवाय त्यांचे महिन्यातील काम पाहून कामगिरीवर आधारित १५ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
कोल्हापूरमधील पात्र उमेदवारांना कोकणात संधी
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील आरोग्य अधिकारी पदाच्या जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा निम्मेही अर्ज आलेले नाहीत. उलट कोल्हापूर जिल्ह्यात तिप्पट अर्ज आले आहेत. त्यामुळे जर कोल्हापूरचे उमेदवार असलेल्या जागांपेक्षा अधिक संख्येने पात्र झाले तर त्यांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सेवा करता येईल, असे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा उपलब्ध जागा आलेले अर्ज
- कोल्हापूर ३८० ९०३
- सिंधुदुर्ग २७० ८०
- रत्नागिरी ३५० १७४
कामाचे स्वरूप
प्रत्येक उपकेंद्रावर या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारपर्यंत थांबणे बंधनकारक असून, त्यांनी येणाऱ्या रुग्णांची देखभाल करावयाची आहे. दुपारनंतर त्यांनी सर्व लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि अन्य शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काम करणे अपेक्षित आहे.