राज्यातील सर्वाधिक पाऊस कोल्हापूरच्या वाकी गावात; विदर्भ, मराठवाड्यातही पावसाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 03:00 AM2019-09-10T03:00:42+5:302019-09-10T03:00:54+5:30
१०,८०६ मिलिमीटरची नोंद; आंबोलीत ८५७५, तर जोर येथे ८१४४ मिलिमीटर पाऊस
चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण बनण्याचा मान राधानगरी तालुक्यातील वाकी या गावाने मिळविला आहे. १ जूनपासून आतापर्यंत तेथे १०,८०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे ८,५७५, सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज (ता. पाटण) येथे ८,१३३ मिलिमीटर आणि जोर (वाई) येथे ८,१४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
महाबळेश्वर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी हा ३५० किमीचा भाग सह्याद्री पर्वतरांगांचा आहे. या पर्वतरांगांमध्ये यंदा अभूतपूर्व पाऊस झाल्याने पावसाच्या नोंदींचे तीनही जिल्ह्यांत नवनवे विक्रम झाले आहेत.
वाकी देशात तिसरे
देशातील सर्वाधिक पावसाची नोंद मेघालयातील मॉसिनराम येथील आहे. तेथे वर्षाला सरासरी ११,८७१ मिलिमीटर पाऊस पडतो. त्याखालोखाल चेरापुंजी येथे ११,७७७ मिलिमीटर पाऊस पडतो. वाकी गावात आजअखेर १०,८०६ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने नोंदविली आहे.
जलविज्ञान प्रकल्पांतर्गत राज्यभर बसविलेल्या पर्जन्यमापकाद्वारे दर पंधरा मिनिटाला पडणाऱ्या पावसाची नोंद पुण्यातील नियंत्रण कक्षात होते. त्यामुळे ताजी नोंद मिळण्यास मदत होते. या नोंदीनुसार पावसाचे हे आकडे आहेत.
कोल्हापूर, विदर्भात पूरस्थिती : वैनगंगा, कृष्णा, पंचगंगा धोक्याच्या पातळीवर
पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर ओसरला असला तरी वैनगंगा, कृष्णा,कोयना, पंचगंगा नद्या धोक्याच्या पातळीवर असल्याने पूरस्थिती कायम आहे. नाशिकमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने गोदावरीला पूर आला आहे. आणखी तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली तरी पंचगंगेसह सर्वच नद्यांची पाण्याची पातळी स्थिर राहिल्याने नदी काठच्या गावांची अस्वस्थता कायम आहे. पंचगंगेची पातळी ३९.१० फुटांवर तब्बल कायम असून, ६८ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. २४ तासांत जिल्ह्यात ३३५.५७ मिलिमीटर पाऊस झाला. सांगलीत कृष्णा नदीपातळी ३३ फुटांवर गेली आहे. सोमवारी कोयना धरणातून ४५ हजार क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे.
दहा गावांना पुराचा वेढा
पूर्व विदर्भात वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील नदीकाठालगतच्या दहा गावांमध्ये पाणी शिरले. तर नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने या तिरोडा-धापेवाडा, तिरोडा-परसवाडा, डांर्गोली गोंदिया या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.भंडारा जिल्ह्णातील चांदोरी-शिगोंरी मार्ग, पवनी-कोदुर्ली मार्ग यासह बावनथडी नदीला पूर आल्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याशी संपर्क मार्ग (रस्ता) बंद आहे.
पावसाचा अंदाज
१० सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बºयाच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ ११ व १२ सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बºयाच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.