कोल्हापुरात अतिवृष्टीने दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:51 AM2017-09-15T00:51:41+5:302017-09-15T00:53:21+5:30
कोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहाकार उडाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहाकार उडाला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वाहने वाहून गेली. पाचशेहून अधिक घरांत पाणी शिरल्याने प्रापंचिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. तीन ठिकाणी तर रस्ते खचले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जोरात कोसळणारा पाऊस, घरांत शिरलेले पाणी, खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे सर्वत्र घबराट पसरली. त्यामुळे बुधवारची रात्र कोल्हापूरकरांनी जागून काढली.
अतिवृष्टीमुळे शहरातील जयंती नाला, गोमती नाला तसेच छोट्या-छोट्या ओढ्यांना लागून असलेल्या घरांना, त्याचबरोबर शहरातील सखल भागातील घरांना सर्वाधिक फटका बसला आहे. पावसाला बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. सुमारे दोन तास अखंड पाऊस पडत होता. पाऊस इतका प्रचंड होता की, अवघ्या काही मिनिटांत शहरातील ओढे, नाले, गटारी ओसंडून वाहायला लागले. शहरातील जयंती नाला, गोमती नाला, शाम हौसिंग सोसायटी नाल्यासह अन्य छोट्या-छोट्या बारा नाल्यांनी आपली मर्यादा सोडली आणि घरांत पाणी शिरायला सुरुवात झाली. शहरात अनेक घरांतून तीन ते चार फुटांपर्यंत पाणी शिरले. शौचालयाच्या टाक्यांत पाणी शिरल्याने त्यांतील घाण घरात पसरली. जोराचा पाऊस आणि घरात पाणी आल्यामुळे लोकांची भीतीने गाळण उडाली.
दोन तासांत तब्बल ७३ मिलिमीटर पाऊस !
शहर परिसरात बुधवारी मध्यरात्री बारा ते दोन या दोन तासांत चक्क ७३ मिलिमीटर पाऊस झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले. करवीर मंडल हद्दीत ७३ मिलिमीटर, कसबा बावडा मंडल हद्दीत ७३, तर निगवे दुमाला हद्दीत ८२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. या आकडेवारीवरून पावसाने शहर परिसरात किती धुमाकूळ घातला, हे दिसून येते. सर्वसाधारण ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला की अतिवृष्टी समजण्यात यावी, असा शासकीय नियम आहे. अतिवृष्टीमुळे जे आर्थिक नुकसान होईल, त्याची भरपाई राज्य सरकारकडून केली जाते.
नुकसानभरपाईचे आदेश; ‘रेड झोन’मध्येही
लक्ष घालू : चंद्रकांतदादा पाटील
शहरामध्ये बुधवारी (दि. १३) रात्री कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्याची नुकसानभरपाई राज्य शासन देईल. शहरातील ‘रेड झोन’मध्येही लक्ष घालू, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केले. ताराबाई पार्क येथील सर विश्वेश्वरय्या हॉल येथे झालेल्या भाजप-ताराराणी आघाडी पक्ष कार्यकर्ता मेळावा व प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.पालकमंत्री म्हणाले, अवकाळी पावसामुळे बुधवारी रात्री ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, ते का झाले याचीही चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना आदेश दिले आहे. रेड झोन हा गंभीर विषय आहे. त्यात हात घालण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला आश्वासित करतो की, या शहरात कोणतेही बेकायदेशीर कृत्य सरकार चालू देणार नाही. रेड झोनसंदर्भात योग्य निर्णय घेऊ.