महामार्ग तिसऱ्या दिवशी बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:34+5:302021-07-26T04:23:34+5:30
सांगली फाटा येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रविवारी तिसऱ्या दिवशी बंदच राहिली. दुपारी बारा वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता ...
सांगली फाटा येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रविवारी तिसऱ्या दिवशी बंदच राहिली. दुपारी बारा वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता दोनवेळा पोकलँडने रस्त्याची चाचपणी केली. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे पोकलँड आत जाऊ शकला नाही. यामुळे महामार्गावरून अवजड वाहतूकही सुरू झाली नाही. काल रात्रीपासून पाण्याची पातळी दीड फुटाने कमी झालेली आहे. मात्र, दुपारनंतर पाण्याची पातळी स्थिर आहे.
सांगली फाटा येथे महापुराचे पाणी शुक्रवारी (दि. २३) दुपारी दोन वाजता पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. कालपासून पावसाने उघडीप दिल्याने पाणी संथगतीने कमी होत आहे. काल सकाळपासून आज दुपारपर्यंत पाण्याची पातळी साडेतीन फुटाने कमी झाली आहे. मात्र, कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. पाण्याला प्रचंड वेग आहे, तरीही आज दुपारी व सायंकाळी पोकलँडने रस्त्याची चाचपणी केली. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे पोकलँड सुमारे पन्नास ते साठ मीटरच्या पुढे आत जाऊ शकला नाही. पाण्याच्या वेगाने पोकलँड सरकत असल्यामुळे पोकलँड परत आला. आज पोकलँड पुढे जाऊ शकला नाही. मात्र, पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर उद्या सकाळी पुन्हा पोकलँडने रस्त्याची चाचपणी करून, अवजड वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सहायक पोलीस प्रशासक किरण भोसले यांनी सांगितले.
---
चौकट
अत्यावश्यक सेवेतील ऑक्सिजन, पेट्रोल, डिझेल व पाण्याचे टँकर व घरगुती गॅस टाकीची वाहने महामार्गावर थांबून आहेत. महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर सुरुवातीला अत्यावश्यक सेवेतील वाहने शहरात सोडण्यात येणार आहेत.
---
महामार्गावर अद्याप पाणी असून पाण्याला प्रचंड वेग आहे. त्यामुळे वाहतूक अद्याप बंद असून महामार्ग सुरू झाल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नका. (सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले)
फोटो ओळी :
अत्यावश्यक सेवेतील वाहनांची लागलेली रांग.