'शक्तिपीठ' दलालांचा महामार्ग, श्रमिक संघटनेचा आरोप; कोल्हापुरात १८ जूनला भव्य मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 03:24 PM2024-06-11T15:24:58+5:302024-06-11T15:25:16+5:30
कोल्हापूर : देवाच्या नावाने दलाल, भांडवलदार आणि कंत्राटदारांचा फायदा करण्यासाठी विनाशकारी शक्तिपीठ महामार्ग विरोधात ‘श्रमिक’ संघटना उतरली असून हा ...
कोल्हापूर : देवाच्या नावाने दलाल, भांडवलदार आणि कंत्राटदारांचा फायदा करण्यासाठी विनाशकारी शक्तिपीठ महामार्ग विरोधात ‘श्रमिक’ संघटना उतरली असून हा महामार्ग देवाचा नव्हे, दलालांचा महामार्ग असल्याचा आरोप श्रमिक संघटनेने केला आहे. या महामार्गाविरोधात मंगळवार, १८ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनातकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार आहेत. १८ जूनला सकाळी ११ वाजता दसरा चौकातून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना प्रत्यक्ष भेटून या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पटवून देण्यात येणार आहे. यावेळी दोन्ही श्रमिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हा प्रवेश नियंत्रित मार्ग असल्यामुळे स्थानिक जनतेला याचा काहीही उपयोग होणार नाही. स्थानिक वाहने, रिक्षा, ट्रॅक्टर, मोटारसायकल, बैलगाडी या मार्गावर नेणे किंवा थांबवणे धोकादायक असल्यामुळे त्याचा स्थानिकांना उपयोग नाही. स्थानिकांना कोणताही रोजगार उपलब्ध होणार नाही. अशा रस्त्यावर वेग वाढवण्यासाठी तो एका पातळीवर करण्यासाठी खुदाई आणि भराव केला जातो. या रस्त्यामुळे गावाच्या शिवाराचे, रानाचे, माळाचे दोन भाग होतील.
ज्याच्या शिवाराचे दोन भाग होतील त्याला एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायचे तर मोठा फेरा काढावा लागतो किंवा आपली जमीन कोणाला तरी कमी भावाने विकून टाकावी लागते. या रस्त्याला समपातळीत आणण्यासाठी जे भराव केले जातील त्यामुळे ओढा, ओघळातील पाणी रानात शिरेल व आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पिके धोक्यात येतील असा आरोप दिघे यांनी केला. हा विकासाचा नसून विनाशाचा रस्ता आहे, म्हणून याला श्रमिक विरोध करत आहे. या पत्रकार परिषदेला प्रकाश कांबरे, गोपाळ पाटील, अनंत कुलकर्णी, सुनील बारवाडे, प्रकाश जाधव, प्रकाश पाटील उपस्थित होते.