‘जिजामाता’च्या अध्यक्षासह १९ संचालकांवर अपहाराचा गुन्हा
By Admin | Published: December 11, 2015 12:42 AM2015-12-11T00:42:58+5:302015-12-11T00:49:01+5:30
यात बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यालयीन अधिकारी व शाखा अधिकाऱ्यांची नावे आहेत.
सातारा : बोगस नोंदी करून रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून जिजामाता बँकेच्या अध्यक्षा अॅड. वर्षा कल्याण माडगूळकर, पती शिरीष अच्युतराव कुलकर्णी यांच्यासह १९ संचालकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलाब आवारे, स्वाती जोशी, संजीवनी इंगळे, सुनीता माने, सुजाता भुजबळ, प्रेमलता ठक्कर, मेघा कुलकर्णी, लता गायकवाड, पवित्रा तपासे, शरयू उंडाळे, लीला मिसाळकर, मीना कणसे, रोहिनी नाळे, सुरेखा पाटणकर, संध्या लिपारे, छाया बकरे, तेजस्विनी भिसे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यात बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यालयीन अधिकारी व शाखा अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १ एप्रिल २०१३ ते दि. ३१ जानेवारी १०१४ या कालावधीत वरील सर्वांनी संगनमत करून बँकेच्या मुख्य तसेच शाखा कार्यालयातील रेकॉर्डवर बोगस व पोकळ आर्थिक नोंदी करून रकमेचा अपहार केला.याबाबत लेखापरीक्षक तानाजीराव जाधव (रा. कऱ्हाड) यांनी शाहूपुरी पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)
रकमेचा उल्लेख नाही !
जिजामाता बँकेमध्ये बोगस नोंदी करून रकमेचा अपहार केल्याची फिर्याद लेखापरीक्षकांनी दिली आहे. मात्र, नेमका किती रुपयांचा अपहार झाला आहे, याची फिर्यादीत नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.