चाफेवाडी-धुमाळवाडीजवळ डोंगर खचला

By admin | Published: July 13, 2016 12:33 AM2016-07-13T00:33:05+5:302016-07-13T00:40:09+5:30

जीवितहानी नाही : पाच एकर शेतीचे नुकसान, शेतजमीन व विहीर भुईसपाट

The hill near Chapayawadi-Dhumalwadi | चाफेवाडी-धुमाळवाडीजवळ डोंगर खचला

चाफेवाडी-धुमाळवाडीजवळ डोंगर खचला

Next

धामोड / कसबा तारळे : राधानगरी तालुक्यातील चाफेवाडी-धुमाळवाडी गावादरम्यान तुळशी नदी पुलानजीकचा रस्त्याच्या वरील बाजूस असणारा एक हजार फूट उंचीचा डोंगर खचल्याने पाच एकर शेतीचे नुकसान झाले. संपूर्ण डोंगरच अतिवृष्टीने खचल्याने या पुलाजवळील ६०० फूट रस्ताही खचला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी या शेतातील ऊस, भात, पिकांबरोबर मोठ-मोठी झाडेही या मातीखाली गाडली गेली आहेत. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी खोदलेल्या विहिरीही जमीनदोस्त झाल्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आहे.
गेल्या चार दिवसांपासून या परिसरात पावसाने अक्षरश: थैमान घातल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी दुर्गमानवाड-तळगाव मार्गावरील चाफेवाडी-धुमाळवाडी दरम्यान तुळशी नदीवर असणाऱ्या पुलाजवळील रस्त्याच्या वरील बाजूचा एक हजार फूट उंचीचा डोंगरच खचून खाली घसरल्याने जवळपास ६०० फूट लांबीचा रस्ता गायब झाला.
रस्त्यासह खचलेल्या त्या मातीने पाच एकरांवरील ऊस व भातशेती गाडून टाकली. हा डोंगर इतक्या मोठ्या प्रमाणात खचला की, शेतामध्ये घसरणारी मोठ-मोठी झाडेही त्यात गाडली गेली आहेत. शेतातील विहिरी, मोटारपंप तर गायबच झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाचे प्रमाण आजही जास्त असल्याने या मार्गावर कोणतीही रहदारी नव्हती. किंबहुना शेताकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चाफेवाडी ते धुमाळवाडी या रस्त्यावर खचलेल्या रस्त्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या भाऊ धोंडी काटकर यांची सात गुंठे शेतजमीन तर अतिवृष्टीमुळे खचून ती खचलेल्या रस्त्यावर आली. त्यामुळे यापूर्वीच खचलेल्या रस्त्याला वरील जमिनीचा मोठ्या प्रमाणातील भार सहन न झाल्याने रस्ता शेतजमिनीसह खालील बाजूस असणाऱ्या बाळू धोंडी काटकर यांच्यासह १५ गुंठे ऊस पिकाच्या शेतविहिरीत कोसळली. पडलेल्या दगड, मातीमुळे ही शेतजमीन व विहीर भुईसपाट झाली. याशिवाय बाळू काटकर, लहू काटकर, शंकर काटकर, हिंदुराव काटकर या शेतकऱ्यांच्याही शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माळीण दुर्घटनेसारखी स्थिती येथे पाहावयास मिळत असून, पावसाचे प्रमाण कमी होत नसल्याने अजूनही डोंगर खचत आहे. या शेतकऱ्यांची शेतीच पूर्णत: मातीखाली गाडल्याने येथे आमची शेती होती का? या विचारात इथला शेतकरी उद्विग्न मनाने विचार करीत होता. लोकांना सध्या या मार्गावरून रस्ताच नसल्याने येत्या काही दिवसांत डोंगरातूनच मार्ग काढावा लागणार आहे.


अधिकारी, आमदार धावले
या घटनेची माहिती कळताच राधानगरीचे तहसीलदार शिवाजी शिंदे व गटविकास अधिकारी एच. डी. नाईक, मंडल अधिकारी, तलाठी तसेच आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण खात्याचे सभापती अभिजित तायशेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली; पण मंगळवारीही पावसाचे प्रमाण कायम असल्याने सुमाळवाडी-बेरकळवाडी ग्रामस्थांना कोणतेच मदतकार्य करता आले नाही.

अतिवृष्टीमुळे हा डोंगर खचला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ताही खचल्याने या लोकांना कोणतीच मदत पुरविता येत नाही. पण, पर्यायी रस्ता करून मदत करण्यात येईल व या लोकांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात येईल.
- शिवाजी शिंदे,
तहसीलदार, राधानगरी.

Web Title: The hill near Chapayawadi-Dhumalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.