हिल रायडर्सतर्फे जुलैमध्ये पन्हाळा-पावनखिंड मोहीम
By admin | Published: June 24, 2016 12:28 AM2016-06-24T00:28:44+5:302016-06-24T01:11:46+5:30
मोहिमेदरम्यान वाटेतील वाड्यांवर मुला-मुलींसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
कोल्हापूर : हिल रायडर्स गु्रपतर्फे ऐतिहासिक पन्हाळा-पावनखिंडची पहिली मोहीम २ व ३ जुलैला, तर दुसरी मोहीम दि. २३ व २४ जुलैला आयोजित केल्याची माहिती गु्रपचे अध्यक्ष प्रमोद पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. १९८६ पासून कोल्हापूरचा ‘हिल रायडर्स अॅँड हायकर्स गु्रप’ महाराष्ट्रातील तसेच देशभरातील ट्रेकर्ससाठी प्रसिद्ध ‘पन्हाळा ते पावनखिंड’ ही ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम आखत आहे. यंदाही या राज्यस्तरीय मोहिमेत पुणे, मुंबई, विदर्भ, मराठवाडा, गुजरात, कोकण, कर्नाटकातून हजारो युवक-युवती सहभागी होणार आहेत. पहिल्या मोहिमेनंतर २३ व २४ जुलैला दुसरी मोहीमही काढली जाणार आहे. मोहिमेदरम्यान वाटेतील वाड्यांवर मुला-मुलींसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
इच्छुकांनी शिवस्वरूप स्टेशनर्स, खरी कॉर्नर, समीर अॅडव्हेंचर्स, हॉटेल पर्लशेजारी, स्टुडिओ एक्स्पोज, राजारामपुरी आठवी गल्ली, सुपरसॉनिक नेट झोन, सायबर रोड, कोल्हापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन पाटील व देवणे यांनी केले आहे.
यावेळी युवराज साळोखे, चंदन मिरजकर, सूरज डोली, सागर बकरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मोहिमेचा मार्ग असा...
पन्हाळगडावरील वीर शिवा काशीद पुतळा व नरवीर बाजीप्रभूंच्या पुतळ्याचे पूजन करून फुटका नंदीमार्गे मोहिमेस सुरुवात केली जाणार आहे. तेथून मसाई पठार-खोतवाडी-मांडलाईवाडी-करपेवाडी-आंबर्डे तर्फ आंबवडे येथे रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी रिंगेवाडी-कळकेवाडी-मळेवाडी-पाटेवाडी-सुकाम्याचा धनगरवाडा-म्हसवडे वाडा-पांढरे पाणी ते पावनखिंड येथे मोहीम समाप्त होणार आहे.
यांचाही सहभाग
हिमालयातील २० हजार फुटांवर असणारे नोरबू हे शिखर यशस्वीरीत्या सर करणारे कोल्हापूरचे उदयोन्मुख गिर्यारोहक शिवतेज पाटील, खुशी कांबोज, प्रसाद आडनाईक, शैलेश भोसले हेही इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.