हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या फराळातून ऋणानुबंध दृढावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:09 PM2017-10-18T23:09:01+5:302017-10-18T23:56:51+5:30
कोल्हापूर : दीपावलीनिमित्त मुस्लिम बांधवांसोबत फराळाच्या केलेल्या उपक्रमातून बुधवारी कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ऋणानुबंध दृढ झाले.
कोल्हापूर : दीपावलीनिमित्त मुस्लिम बांधवांसोबत फराळाच्या केलेल्या उपक्रमातून बुधवारी कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ऋणानुबंध दृढ झाले. संयुक्त रविवार पेठेच्या वतीने बिंदू चौकात आयोजित केलेल्या फराळाच्या कार्यक्रमात अनेक हिंदू, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
दीपावलीचे निमित्त साधून संयुक्त रविवार पेठेच्या वतीने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या सलोख्याचे नाते जपणाºया कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी तसेच नूतन संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
शाहूंच्या कोल्हापूर नगरीतील पेठापेठांत सर्व जातिधर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, त्या बहुजन समाजातील ऐक्याचे नाते आणखी दृढ व्हावे यासाठी अशा उपक्रमांचे जाणीवपूर्वक आयोजन केले जात असल्याचे गौरवोद्गार देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांनी काढले. अशा सामाजिक, विधायक उपक्रमांचे गल्लीबोळांत आयोजन करण्यात यावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महेश ढवळे यांनी प्रास्ताविक केले. संयुक्त रविवार पेठचे अध्यक्ष संतोष लाड यांनी स्वागत केले; तर विशाल शिराळकर यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक ईश्वर परमार, राहुल चव्हाण, महेजबीन मुजावर, अजित गायकवाड, नजीर देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.