लव्ह जिहादविरोधात कोल्हापुरातील इचलकरंजीत हिंदू जनआक्रोश मोर्चा; सरकारने जागे व्हावे, अन्यथा..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 02:25 PM2022-12-26T14:25:28+5:302022-12-26T14:25:58+5:30
आबालवृद्धांसह महिला व युवतींचा मोठा सहभाग
इचलकरंजी : लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, या मागणीसाठी रविवारी हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चात आबालवृद्धांसह महिला व युवती हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या. आता सरकारने जागे व्हावे; अन्यथा हिंदूंनी निर्णय घेतल्यास तेव्हा हस्तक्षेप करू नये, असा इशारा बजरंग दलाचे सहसंयोजक नितीन महाजन (पुणे) यांनी दिला.
शहरातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून लव्ह जिहादविरोधीहिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरूवात झाली. भगवे ध्वज, भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते श्रीरामाचा जयघोष करीत होते. विविध मागण्यांचे फलक व अखंड घोषणा देत मुख्य मार्गांवरून मोर्चा महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहचला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
यावेळी महाजन म्हणाले, हिंदूंनो अजूनही वेळ गेली नाही, जागे व्हा. आपली एकत्र कुटुंब पद्धती मोडली आहे, नाती तुटली आहेत. त्यामुळे आपणच कामाच्या व्यापातून थोडे लक्ष द्या. आपल्या मुलींचे मित्र बना. परधर्मातील व्यक्तीशी मैत्री होऊ नये, याची काळजी घ्या.
आशुतोष झा (बिहार) यांनी, प्रेम करणं गुन्हा नाही. परंतु ते कुणावर करावं हा गुन्हा आहे. महाविद्यालयातील मुले-मुली आणि सोशल मीडिया या जिहादला कारणीभूत ठरत आहेत. पालकांनी त्यावरही लक्ष द्यावे. राजकीय नेते वेगवेगळ्या पदांवर पोहचतात. छत्रपतींचे राजकारणासाठी नाव घेतात, परंतु धर्म विसरतात. आपणच धर्माचे व माता-भगिनींचे रक्षण करा. धर्म व राष्टÑ हितासाठी नेहमी जागरूक रहा, असे आवाहन केले.
मोर्चामध्ये गजानन महाजन (गुरूजी), आमदार प्रकाश आवाडे, जवाहर छाबडा, विहिंप, बजरंग दल व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वारकरी संप्रदायातील संत, तसेच तृतीयपंथीही सहभागी झाले होते.
मोठा पोलिस बंदोबस्त
मोठ्या संख्येने निघालेल्या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यासह सुमारे ६०० पोलिसांचा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात केला होता.