Kolhapur- विशाळगडावरील अतिक्रमण: संभाजीराजेंच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांचा सवाल
By उद्धव गोडसे | Published: July 10, 2024 03:47 PM2024-07-10T15:47:09+5:302024-07-10T15:50:32+5:30
राज्यातील सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचे आवाहन, अन्यथा..
कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणांचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही माजी खासदार संभाजीराजेंनी घेतलेली आंदोलनाची भूमिका अनाकलनीय आहे. संभाजीराजेंनी याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे काढावित अन्यथा हिंदुत्ववादी संघटना वक्फ बोर्डाच्या जागांवर मंदिरे बांधतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी बुधवारी (दि. १०) पत्रकार परिषदेतून दिला.
यावेळी ते म्हणाले, 'विशाळगडावरील काही स्थानिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेला ब्रेक लागल्याचे सर्वांना माहिती आहे. जिल्हा प्रशासनानेही अतिक्रमणे हटवण्याची भूमिका घेतली आहे. सरकारही त्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय नक्कीच सकारात्मक येईल. असे असताना माजी खासदार संभाजीराजे यांनी घेतलेली आंदोलनाची भूमिका अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. त्यांनी केवळ विशाळगडापुरता विचार न करता राज्यातील सर्वच गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आंदोलन सुरू करावे. राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना त्यांच्यासोबत राहतील.'
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विशाळगडावरील अतिक्रमण वाढले. त्यामुळे सरकारने ते काढण्याचा खर्च प्रशासकीय अधिका-यांकडून वसूल करावा, अन्यथा वक्फ बोर्डाच्या जागांवर मंदिरे बांधण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला. पत्रकार परिषदेसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कुंदन पाटील यांच्यासह दीपक देसाई, उदय भोसले, मनोहर सोरप, गजानन तोडकर, निरंजन शिंदे, अभिजित पाटील, योगेश केळकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, आशिष लोखंडे, सुनील सामंत, आदी उपस्थित होते.
वाद केवळ अतिक्रमणांचा
विशाळगडावरील वाद दोन धर्मातील नसून तो केवळ अतिक्रमणांचा आहे. दोन्ही धर्मियांची अतिक्रमणे आहेत. सर्वच अतिक्रमणे काढून गड स्वच्छ आणि सुरक्षित करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे. त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह व्हिडिओ, मेसेज तयार करून ते सोशल मीडियात व्हायरल करू नयेत, असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केले.