कोल्हापूरच्या स्वप्निलने बनविला हिरकणीचा स्टोरी बोर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 12:04 PM2019-11-05T12:04:07+5:302019-11-05T12:06:38+5:30
अल्पावधीतच रसिकप्रिय झालेल्या मराठी ‘हिरकणी’ या सिनेमाचा स्टोरीबोर्ड कोल्हापूरचा चित्रकार कलावंत स्वप्निल पाटील याने बनविला आहे. त्याने काढलेल्या चित्रांच्या आधारेच सिनेमातील अनेक प्रसंगांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : अल्पावधीतच रसिकप्रिय झालेल्या मराठी ‘हिरकणी’ या सिनेमाचा स्टोरीबोर्ड कोल्हापूरचा चित्रकार कलावंत स्वप्निल पाटील याने बनविला आहे. त्याने काढलेल्या चित्रांच्या आधारेच सिनेमातील अनेक प्रसंगांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
मूळचा करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथील स्वप्निल पाटील याला चित्रकला आणि शिल्पकला प्रदर्शनात आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच मुंबईतील प्रतिष्ठेच्या जहॉँगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरीसह राज्यातील अनेक ठिकाणी चित्रप्रदर्शनेही भरविलेली आहेत.
याशिवाय स्वप्निलने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक सिनेमांसाठी सहायक कलादिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. काही मराठी सिनेमांसह ‘साजणा’ या मालिकेचे शीर्षक गीत, काही व्यावसायिक जाहिरातींचेही स्टोरी बोर्ड त्याच्या कुंचल्यातून उतरले आहेत.
स्वप्निलने ‘हिरकणी’ सिनेमातील छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यातील गाण्यातील प्रसंग, जिथून हिरकणी रायगडाच्या पश्चिम कड्यावरून उतरते तो प्रवास आणि शेवटची लांडग्याशी होणारी लढाई हे प्रसंग ‘फ्रेम टू फ्रेम’ पेन्सिलच्या साहाय्याने रेखाटले.
यासाठी महिनाभर त्याने परिश्रम घेतले. दिग्दर्शक प्रसाद ओक, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, कॅमेरामन संजय मेमाणे, फाईट मास्टर अमर शेट्टी यांनी त्याला मार्गदर्शन केले. फुटाणे यांनी तर रायगडावरील कड्याचा हुबेहूब डमी कडा बनविला होता. त्याच्या साहाय्याने स्वप्निलने अनेक प्रसंगांचे स्टोरी बोर्ड रेखाटले.
‘लोकमत’मुळे मिळाली संधी
‘लोकमत’ने २0१0 मध्ये भरविलेल्या श्लोक प्रदर्शनातून स्वप्निलच्या कारकीर्दीला प्रारंभ झाला. त्याने गतवर्षीच्या केलेल्या ‘तु. का. पाटील’ या सिनेमाच्या स्टोरीबोर्डची बातमी वाचून कला दिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी हिरकणी सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओक यांची भेट घडवून आणली आणि हा सिनेमा मिळाला.
असा करतात स्टोरी बोर्ड
मराठी सिनेमामध्ये अलिकडे रोज नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यामध्ये स्टोरी बोर्डचाही समावेश आहे. प्रामुख्याने अॅनिमेटेड आणि हॉलिवूड चित्रपटांसाठी स्टोरी बोर्ड सर्रास वापरला जातो. ही संकल्पना जुनी असली तरी, त्याचा काही मोजक्याच सिनेमांमध्ये वापर झाला आहे. स्टोरी बोर्ड म्हणजे दिग्दर्शकाच्या नजरेतून उतरला जाणारा सिनेमा.
कथेतील प्रसंगांची रेखाटने आधीच तयार करून त्याबरहुकूम सिनेमा बनविणे दिग्दर्शकाला सोईचे जाते; यासाठी चित्रकाराकडून ‘फ्रेम टू फ्रेम’ रेखाटने कागदावर काढून घेतली जातात, मग त्यानुसार प्रत्यक्ष चित्रीकरण केले जाते. याचा फायदा दिग्दर्शकासोबतच कलाकार, कॅमेरामन आणि एडिटर यांनाही होतो. यामुळे कमी कालावधीत सिनेमा पूर्ण करता येतो.