चिकोत्राच्या पाणीसाठ्यासाठी हिरण्यकेशीचा पर्याय - चंद्रकांतदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 05:02 AM2017-11-27T05:02:52+5:302017-11-27T05:03:11+5:30
आजरा तालुक्यातील आंबेओहळ, चिकोत्रा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यास हिरण्यकेशी नदीचा पर्याय शासनाच्या विचाराधीन असून, याबाबत निधीची तरतूद करू, आराखडा तयार करा अशा सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना केली.
उत्तूर : आजरा तालुक्यातील आंबेओहळ, चिकोत्रा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यास हिरण्यकेशी नदीचा पर्याय शासनाच्या विचाराधीन असून, याबाबत निधीची तरतूद करू, आराखडा तयार करा अशा सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना केली. वडकशिवाले (ता. आजरा) येथे विजयी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी घाटगे होते.
पालकमंत्री पाटील यांच्या स्वागताची तयारी ग्रामस्थांनी जोरदार केली. पालकमंत्री यांच्या हस्ते खडीकरण-डांबरीकरणाचा प्रारंभ झाला. २० वर्षांनंतर सत्तांतर झाल्यामुळे गाव भाजपामय झाले होते.
पाटील म्हणाले, वडकशिवाले गावाने इतके परिवर्तन केले आहे की, आमदार हसन मुश्रीफ यांना हा पराभव जिव्हारी लागला आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात परिवर्तन झाले ही कौतुकाची बाब आहे.
वडकशिवालेकरांनी गावतलावाचा गाळ श्रमदानातून काढून घ्यावा, अधिक पाणीसाठा झाल्यास त्याचा वापर शेतीसाठी करावा, शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारा निधी देतो. आंबेओहळ, चिकोत्रात पाणीसाठ्याची गरज ओळखून आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आर्दाळ-हालेवाडी-वडकशिवाले या ग्रामीण रस्त्यास मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजुरी मिळाली असून, या कामास सुरुवात होणार आहे.
‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, २० वर्षांत गावचा विकास न झाल्याने परिवर्तन झाले आहे. फाउंडेशनतर्फे ‘जलयुक्त शिवार’ राबवा असे आवाहन केले. आंबेओहळ, चिकोत्रातील पाणीसाठा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आजरा कारखाना अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, आजरा तालुका भाजपामय झाला आहे. ३६ पैकी २२ ग्रामपंचायतींवर भाजपाचे कमळ फुलले आहे. सूतगिरणीसाठी सात कोटी बिनव्याजी, तर दोन कोटी २१ लाख शासनाने माफ केले आहे. त्यामुळे सूतगिरणीस चांगले दिवस आले आहेत.
आपल्या विजयाबाबत बोलताना सरपंच संतोष बेलवाडे म्हणाले, दीड वर्षात आम्ही विकासकामे घेऊन जनतेसमोर गेलो. गावाने आम्हाला निवडून दिले आहे. आम्ही सारे एकदिलाने काम करूया यासाठी साथ द्या.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वीय साहाय्यक प्रकाश बेलवाडे यांनी परिसरातील विविध गावच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसचे तसेच धरणग्रस्तांच्या जमिनींचे वाटप करण्यात आले.
दादांनी घेतली ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
‘हिरण्यकेशीतून आंबेओहळ चिकोत्रासाठी पाणी योजना करा’ अशा आशयाचे ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी कागलच्या मेळाव्यात पाणीसाठ्यासंदर्भात चर्चा केली होती. ‘लोकमत’चे वृत्त चंद्रकांतदादांनी आवर्जून वाचन केले. याबाबत त्यांनी घाटगे यांच्याशी चर्चा केली.
हारतुरेऐवजी गुलाबपुष्प : वडकशिवालेत विजयी मेळावा दिमाखात साजरा केला. पण, कोणत्याही नेत्यांना, पदाधिकारी यांचे स्वागत व सत्कार शाल, श्रीफळ व हार न नेता केवळ गुलाबपुष्प देऊन करण्यात येत होते याची कार्यक्रमस्थळी चर्चा झाली.