रविकिरण पेपर मिलमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कामावर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:52+5:302020-12-17T04:47:52+5:30
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमधील रविकिरण पेपर मिल्समध्ये कंपनीच्या मालकांनी कामगारांना योग्य मोबदला न देता राबवून ...
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमधील रविकिरण पेपर मिल्समध्ये कंपनीच्या मालकांनी कामगारांना योग्य मोबदला न देता राबवून घेत होते. आठवड्याची सुट्टीही दिली जात नव्हती. याबाबत कामगारांनी वेळोवेळी मागणी करूनही कंपनीने कामगारांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. उलट कंपनी संचालकांनी सहा स्थानिक कामगारांना निलंबित केले आहे. उर्वरित ४८ कामगारांची नोंद दोन ठेकेदाराकडे कागदोपत्री दाखविली आहे.
सध्या काम नसल्याचे कारण दाखवून त्यांनाही कामावरून कमी करण्यात आले आहे. सध्या ५० हून अधिक उत्तर भारतीय कामगार कंपनीत काम करीत आहेत. त्या कामगारांना काम आहे; पण स्थानिक कामगारांना काम नाही. त्यामुळे स्थानिक कामगारांवर अन्याय झाल्याने शांततेच्या मार्गाने कामगारांनी संप पुकारला आहे. त्यामुळे स्थानिक ८० टक्के भूमिपुत्रांना कामावर घ्यावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे कोल्हापूर विभागाचे कामगार आयुक्त संदेश आयरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, रविकिरण पेपर मिल्सचे कामगारांची प्रांताधिकारी, तहसीलदार, मालक आणि व्यवस्थापक यांची तातडीची बैठक घ्यावी, निलंबित कामगारांना त्वरित कामावर घ्यावे, कामगार कायद्याप्रमाणे ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरीत घ्यावे, केंद्र व राज्य शासनाचे कामगार कायद्याच्या अंमलबजावणीची सक्ती संबंधित कंपनीला करण्यात यावी.
------------------------
फोटो ओळी : शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी कामगार आयुक्त संदेश आयरे यांना निवेदन दिले.
क्रमांक : १६१२२०२०-गड-०२