पेपर मिल कामगारांना तत्काळ कामावर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:22 AM2020-12-08T04:22:43+5:302020-12-08T04:22:43+5:30
चंदगड /प्रतिनिधी : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे जनआंदोलन समिती व सर्व श्रमिक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड ...
चंदगड /प्रतिनिधी : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे जनआंदोलन समिती व सर्व श्रमिक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड तालुक्यातील तरुणांवर ‘रविकिरण पेपर मिल’च्या मालकांनी चालवलेल्या अन्यायाविरुद्ध सोमवारी कामगार अन्याय निवारण परिषद आयोजित केली होती.
किमान वेतन मिळावे, कामगारांना कायमस्वरूपी सेवेत कायम समावेश करावा, निलंबित कामगारांना सेवेत तत्काळ रुजू करून घ्यावे, अन्यथा मोठे उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सर्व श्रमिक संघटना अध्यक्ष अतुल दिघे यांनी दिला.
या कारखान्यात भागातील ६० पेक्षा अधिक कामगार आहेत. कमी पगारामध्ये जास्त काम करून घेणे, महागाई भत्ता नाही, कामगारांना काढून टाकणे अशा विविध मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून कामगारांनी शांततेत संप पुकारला, पण कारखानदारांना कामगारांची दया आली नाही.
संतोष मळविकर म्हणाले, पेपर मिलचे मालक चंदगड तालुक्यातील कामगारांवर मुजोरी करून आपली आर्थिक तिजोरी भरत असतील तर चंदगडच्या लालमातीचा हिसका दाखवू, असा धमकीवजा इशारा दिला. माजीमंत्री भरमूआण्णा पाटील यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, सुनील शिंत्रे, अनिल तळगूळकर यांची भाषणे झाली. १० दिवसांत कामगारांचा प्रश्न निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात करण्यात येईल, अशा प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिल्या. पांडुरंग बेनके यांनी आभार मानले. मागण्यांचे निवेदन पेपर मिलच्या मालकांना देण्यात आले. यावेळी तानाजी गडकरी, आर. जी. पाटील, माया पाटील, जोतिबा जोशीलकर, आनंदा भोसले, मारोत गावडे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :-- 1) पाटणे फाटा ता.चंदगड येथे पेपर मिलच्या कामगारांनी धरणे आंदोलन केले व हात उंचावून मिल प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवला.
2) श्रमिक संघटना अध्यक्ष अतुल दिघे मार्गदर्शन करताना.