पेपर मिल कामगारांना तात्काळ कामावर घ्या..अन्यथा उग्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 02:34 PM2020-12-08T14:34:23+5:302020-12-08T14:37:59+5:30
Labour, morcha, kolhapurnews किमान वेतन मिळावे, कामगारांना कायमस्वरूपी सेवेत कायम समावेश करावा, निलंबित कामगारांना सेवेत तात्काळ रुजू करून घ्यावे, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा पाटणे फाटा (ता.चंदगड) येथे सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी दिला. याबाबत पेपर मिल मालकांना निवेदन देण्यात आले.
चंदगड :पाटणे फाटा (ता.चंदगड) येथे जनआंदोलन समिती व सर्व श्रमिक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड तालुक्यातील तरुणांवर रविकिरण पेपर मिलच्या मालकांनी चालविलेल्या अन्यायाविरुद्ध कामगार अन्याय निवारण परिषद आयोजित केली होती.
किमान वेतन मिळावे, कामगारांना कायमस्वरूपी सेवेत कायम समावेश करावा, निलंबित कामगारांना सेवेत तात्काळ रुजू करून घ्यावे, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी दिला. याबाबत पेपर मिल मालकांना निवेदन देण्यात आले.
कारखान्यात भागातील ६० पेक्षा अधिक कामगार आहेत. कमी पगारामध्ये जास्त काम करून घेणे, महागाई भत्ता नाही, कामगारांना काढून टाकणे अशा विविध मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून कामगारांनी शांततेत संप पुकारला पण कारखानदारांना कामगारांची दया आली नाही.
अॅड. संतोष मळवीकर म्हणाले, पेपर मिलच्या मालकांनी चंदगड तालुक्यातील कामगारांवर मुजोरी करून आपली आर्थिक तिजोरी भरत असतील तर चंदगडच्या लालमातीचा हिसका दाखवू. माजीमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देवून पाठिंबा दिला.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, सुनिल शिंत्रे, अनिल तळगुळकर यांची भाषणे झाली. १० दिवसात कामगारांचा प्रश्न निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदेलनात तानाजी गडकरी, आर. जी. पाटील, माया पाटील, जोतिबा जोशिलकर, आनंदा भोसले, मारोत गावडे आदींसह कामगार सहभागी झाले आहेत. पांडुरंग बेनके यांनी आभार मानले.