ऐतिहासिक माणगाव परिषद लघुपटाच्या रूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:17 AM2021-06-27T04:17:14+5:302021-06-27T04:17:14+5:30
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत १९२० साली झालेल्या परिषदेला १०१ वर्षे पूर्ण ...
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत १९२० साली झालेल्या परिषदेला १०१ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘माणगाव परिषद १९२०’ या लघुपटाचे ऑनलाईन लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने ऐतिहासिक ठेवा निर्माण केल्याबद्दल विभागाचे कौतुक केले.
या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, शाहू छत्रपती, राज्य वित्त आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, उर्वरीत वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई ऑनलाईन सहभागी झाले होते.
या लघुपटात तत्कालीन बहिष्कृत समाज बांधवांची अवस्था, जातीव्यवस्था व अन्यायाच्या उतरंडीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी शाहू महाराजांनी केलेले प्रयत्न, माणगाव परिषदेत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे समाजाच्या नेतृत्वाची दिलेली धुरा याचा आढावा घेण्यात आला आहे. या लघुपटासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनविण्यात आली होती. पुण्याच्या रिडिफाईन कॉन्सेप्टस या संस्थेचे योगेश देशपांडे यांनी लघुपटाची निर्मिती-दिग्दर्शन केले आहे. या निर्मितीत प्रशांत सातपुते यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही योगदान दिले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक गणेश रामदासी, गोविंद अहंकारी यांनी सर्वांचे स्वागत केले. महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी प्रास्ताविकात लघुपटनिर्मितीमागील पार्श्वभूमी सांगितली. मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी आभार मानले.
---
फोटो नं २६०६२०२१-कोल-माणगाव लघुपट
ओळ : कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयनिर्मित माणगाव परिषद या लघुपटातील एक प्रसंग.
---