ऐतिहासिक ठेवा संवर्धनाची मोहीम
By admin | Published: March 25, 2015 09:11 PM2015-03-25T21:11:26+5:302015-03-26T00:28:29+5:30
गुडमॉर्निंग ग्रुपची गडसेवा : ज्येष्ठ नागरिकांसह पंधराजणांचा सहभाग
यड्राव : समाजात यशस्वीपणे वाटचाल करत असताना समाजासाठी काही तरी करण्याची संकल्पना सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या मंडळींमध्ये रूजते. त्यातून योग प्रकार, परिसर स्वच्छता, भ्रमंतीमधून निसर्ग दर्शन, याबरोबर गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहिमेबरोबरच ऐतिहासिक ठेवा संवर्धनासाठीचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न येथील एव्हरग्रीन गुडमॉर्निंग ग्रुपने केला आहे. यामध्ये ४५ वर्षांपासूनच्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग युवकांपुढे आदर्श ठरत आहे. तर प्रत्येक सोमवारी हातकणंगले तालुक्यातील ‘अल्लमप्रभू’ डोंगरावर परिसर स्वच्छता वृक्ष संवर्धनाचे कार्य सुमारे एक वर्षापासून सुरू आहे.एव्हरग्रीन गुडमॉर्निंग ग्रुपच्यावतीने शिवकालीन गडकिल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन व ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या हेतूने गडसेवा मोहीम झाली. यामध्ये प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा परिसर, तुळजाभवानी मंदिर परिसर स्वच्छता, दगडाची शिस्तबद्ध मांडणी केली. रायगडावर पदभ्रमंती, समाधी परिसर स्वच्छता, शिवकालीन दरबार व्यवस्थेची माहिती घेतली. सज्जनगडावरील रामदास स्वामी मंदिर परिसर व शिवकालीन व पौराणिक वास्तूची स्वच्छता व स्वामींनी वापरलेल्या वस्तूंची पाहणी केली. या मोहिमेत वीरेंद्र म्हेत्रे, विनायक जोशी, आप्पासाहेब पाटील, विजय खोत, सुरेश शिंदे, तानाजी जाधव, विजय खोत (तारदाळ), चंद्रकांत उदगावे, निवृत्ती चोपडे, कृष्णात सातपुते, सचिन शिंदे, डॉ. राजू आष्टेकर, राजेंद्र आमणगे यांचा सहभाग होता.
एव्हरग्रीन गुडमॉर्निंग ग्रुपच्यावतीने येथील स्टारनगरमध्ये गेल्या सहा ते सात वर्षांपासून योगगुरू कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणे, पळणे, जॉगिंग, योगासन, प्राणायाम, सुक्ष्म व्यायाम, कवायत, हास्य प्रकार असे आरोग्यदायी विविध व्यायाम प्रकार सर्वांना मोफत शिकविण्यात येतात.