बहुजन मूक बनल्याने इतिहासाची विकृती : अमोल मिठकरी --कागल येथे व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:45 AM2018-04-20T00:45:09+5:302018-04-20T00:45:09+5:30
कागल : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समोर येत नाही कारण आम्ही बहुजन मूक बनल्याने आमच्या इतिहासाचे विकृतीकरण झाले, असे मत प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. अमोल मिठकरी यांनी मांडले.
कागल येथील शिवशाहू विचारमंच आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त हे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ होते.
अमोल मिठकरी म्हणाले, संत तुकारामांच्या लेखणीतून शिवशाही निर्माण झाली, तर रामदासांच्या लेखणीतून पेशवाई उदयास आली. कवी परमानंदांनी छत्रपती शिवरायांवर पहिला ग्रंथ लिहिला. त्याचे नाव ‘शिवभारत’ होते. ‘शिव हिंदुस्थान’ असे नव्हते. शिवरायांनी किल्ल्यांवर गजशाळा, अश्वशाळा बांधल्या; मात्र गोशाळा नाही. अफझलखानाचा कोथळा तर काढलाच; पण त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीलाही ठार केले. त्याच अफझलखानाची कबर बांधली; पण कुलकर्णी याची नाही.
यावेळी के. पी. पाटील, नगराध्यक्षा माणिक माळी, भैया माने, चंद्रकांत गवळी, युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, राजू लाटकर, प्रकाश गाडेकर उपस्थित होते. गैबी चौकात झालेल्या या व्याख्यानास गर्दी झाली होती. प्रवीण काळबर यांनी स्वागत, तर नितीन दिंडे यांनी आभार मानले.
राजकीय टीका-टिप्पणी
मिठकरी म्हणाले, की आमचा बहुजनांचा ‘गण’ राक्षस गण असल्याने मंत्री चंद्रकांत पाटील ‘मी राक्षस आहे’ असे जाहीर करतात. आमच्याकडे इंद्र देव पूजला जात नाही; पण तरीही आमच्या डोक्यावर देवेंद्र, नरेंद्र आणि सगळे दारिद्र्य ठेवले आहे. तुम्ही किती वर्षे राम मंदिर बांधतो बांधतो म्हणून सांगत आलात; पण आमदार हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये राम मंदिर बांधून दाखविले आहे.
वारसा सांगू नये
मिठकरी म्हणाले, ज्यांना नीट शिवाजी महाराज कळाले नाहीत, त्यांना ‘शाहू’ महाराज काय कळणार? ज्यांना छत्रपतींचे विचार जपता येत नाहीत त्यांनी ‘शाहूं’च्या रक्ताचा वारसा सांगू नये. हा रक्ताचा वारसा कितीजणांना माहीत आहे हे मला माहीत नाही; पण शाहूंच्या विचारांचा वारसा आम्हाला आहे. आमदार हसन मुश्रीफांना आहे आणि विचारांचा वारसा कधी बेईमान होत नाही.