‘अक्षरगप्पा’मध्ये उलगडला राष्ट्रप्रतीकांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:21 AM2019-06-04T10:21:47+5:302019-06-04T10:23:37+5:30

राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रध्वज, प्रतिज्ञा आणि राजमुद्रा या भारतीय राष्ट्रप्रतीकांचा इतिहास  उलगडण्यात आला. ‘अक्षरगप्पां’च्या १०३ व्या भागामध्ये पुणे येथील मिलिंद सबनीस यांनी अतिशय विस्ताराने या प्रतीकांच्या निर्मितीमागील अनेक कहाण्या यावेळी विशद केल्या.

History of National Symbols in 'Aksharagappa' | ‘अक्षरगप्पा’मध्ये उलगडला राष्ट्रप्रतीकांचा इतिहास

‘अक्षरगप्पा’ कार्यक्रमामध्ये मिलिंद सबनीस यांनी राष्ट्रप्रतीकांच्या निर्मितीचा इतिहास उलगडला.

Next
ठळक मुद्देसुभाषबाबूंचे ‘मार्च पास’, रवींद्रनाथ टागोरांचे गायन‘अक्षरगप्पा’मध्ये उलगडला राष्ट्रप्रतीकांचा इतिहास

कोल्हापूर : राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रध्वज, प्रतिज्ञा आणि राजमुद्रा या भारतीय राष्ट्रप्रतीकांचा इतिहास  उलगडण्यात आला. ‘अक्षरगप्पां’च्या १०३ व्या भागामध्ये पुणे येथील मिलिंद सबनीस यांनी अतिशय विस्ताराने या प्रतीकांच्या निर्मितीमागील अनेक कहाण्या यावेळी विशद केल्या.

‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमामध्ये सबनीस म्हणाले, ‘जन गण मन’ हे गीत पंचम जॉर्जच्या स्तुतिपर लिहिल्याचा आक्षेप घेतला जातो; परंतु अशा प्रकारचे स्तुतिपर गीत लिहिण्यासाठी टागोर यांनी नकार दिला होता; मात्र यानिमित्ताने जी परिषद झाली, त्यासाठी त्यांनी हे गीत लिहिले होते. जॉर्ज यांच्या स्वागतासाठीचे गीत अन्य कवींकडून लिहून घेण्यात आले होते. याबाबत टागोर यांनीच खुलासा केला होता.

सारनाथच्या गांधारशैलीतील शिल्पस्तंभावरून तीन मुद्रांचा सिंह अशी आपली राजमुद्रा तयार करण्यात आली. या मुद्रेवर ‘सत्यमेव जयते’ हे शब्द असावेत, यासाठी आंध्रप्रदेशातील सी. व्ही. वारद यांनी भारत सरकारशी ३० वर्षे लढा दिला. यानंतर हे शब्द वापरण्याचे मान्य करण्यात आले. आंध्रप्रदेशातीलच निसर्गोपचार तज्ज्ञ, लेखक पॅडेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये आपल्या शाळेतील मुलांसाठी तेलुगू भाषेत पहिल्यांदा प्रतिज्ञा लिहिली. नंतर ती सर्व देशभर मान्यता पावली.

भारतीय संस्कृतीमध्ये ध्वजाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगून सबनीस म्हणाले, १८५७ सालच्या बंडावेळी जो ध्वज तयार करण्यात आला होता, त्यामध्ये भाकरी आणि कमळ या चिन्हांचा वापर करण्यात आला होता. देशासाठी पहिला ध्वज तयार करण्याची कामगिरी मूळच्या विदेशातील असलेल्या भगिनी निवेदिता यांनी करून दाखविली. सभोवती असलेल्या १०८ ज्योती आणि त्यामध्ये इंद्राचे अस्त्र दाखवून त्यावर ‘वंदे मातरम्’ लिहिण्यात आले होते.

ऋषी बंकिमचंद्र चटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपले राष्ट्रगीत ठरले नव्हते; त्यामुळे १४ आॅगस्टच्या मध्यरात्री ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’ ही दोन्ही गीते गाइली गेली. रवींद्रनाथ टागोर यांच्यापासून ए. आर. रेहमान, अजय-अतुल यांच्यापर्यंत अनेकांनी ‘वंदे मातरम्’ला नवनवीन चाली लावत त्याचे सादरीकरण केले आहे. असे भाग्य केवळ ‘वंदे मातरम्’ या गीताला मिळाले. या गीतासाठी बंगालमधील मान्यवरांनी जितके योगदान दिले, त्यापेक्षा अधिक योगदान मराठी माणसांनी दिले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे ‘मार्च साँग’ म्हणून हे गीत म्हटले जाई, अशी माहिती सबनीस यांनी दिली. यावेळी सुभाषचंद्र बोस यांची चित्रफीत आणि टागोर यांनी गाइलेले ‘वंदे मातरम्’ ऐकायला मिळाल्याने श्रोते भारावून गेले. रवींद्र जोशी यांनी स्वागत केले, तर समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूरची आठवण
सबनीस म्हणाले, कोल्हापूरचे अल्लादिया खाँ यांचे चिरंजीव बुर्जी खाँसाहेब यांनी ‘वंदे मातरम्’ गीत नव्याने बसविण्यासाठी घेतले होते; मात्र याच दरम्यान त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांचे हे काम अपूर्ण राहिले.

 

 

Web Title: History of National Symbols in 'Aksharagappa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.