इतिहासाच्या मार्केटिंगची गरज
By admin | Published: December 30, 2014 11:58 PM2014-12-30T23:58:33+5:302014-12-31T00:10:48+5:30
मालोजीराजे : ‘आपलं कोल्हापूर’ दिनदर्शिकेचे प्रकाशन
कोल्हापूर : महाराष्ट्राला आणि कोल्हापूरला फार मोठा इतिहास लाभला आहे. तो फक्त ग्रंथांपुरता आणि अभ्यासकांपुरता मर्यादित न राहता तरुणाईच्या मनांपर्यंत झिरपला पाहिजे, त्यासाठी इतिहासाचे मार्के टिंग करण्याची गरज आहे. त्याचे एक उत्तम माध्यम म्हणून चित्रमय रूपातील ‘आपलं कोल्हापूर’ दिनदर्शिका काम करील, असे मत श्रीमंत मालोजीराजे यांनी व्यक्त केले.
परमाळे ग्रुप व ब्रॅँड शेफच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘आपलं कोल्हापूर’ या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हॉटेल के ट्रीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. यावेळी पन्हाळ्याचे नगराध्यक्ष असिफ मोकाशी, अनिल परमाळे उपस्थित होते.
मालोजीराजे म्हणाले, इतिहास सांगण्यासाठी फक्त ग्रंथ हेच एकमेव माध्यम नाही. चित्रमय पुस्तके, छोटी पुस्तिका, चित्रे अशा अनेक माध्यमांतून तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो. आता इतिहासाचे मार्केटिंग करण्याची गरज आहे.
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, तरुणाईला इतिहासाबद्दल अनास्था आहे, हा आरोपच मला चुकीचा वाटतो. शौर्याची गाथा सांगणाऱ्या गडकोटांच्या संवर्धनासाठी तरुणाई पुढाकार घेत आहे. किल्ल्यांची स्वच्छता केली जात आहे. गडकोटांसह सर्व ऐतिहासिक वास्तू आपला इतिहास सांगत असतातच. त्यांकडे फक्त पर्यटनस्थळ म्हणून न पाहता वास्तूंचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे.
यावेळी असिफ मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल परमाळे यांनी स्वागत केले. सचिन मोरे यांनी सूत्रसंचालन केले. रेखा परमाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)