लोककलेच्या अभ्यासकांसमोर उलगडला पोवाड्याचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 11:56 AM2021-05-25T11:56:38+5:302021-05-25T11:58:48+5:30
culture Mumbai University Kolhapur : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यशाळेत कोल्हापुरातील शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांनी पोवाड्याचा इतिहास सांगून आकृतिबंधाची मांडणी केली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या लोककलेच्या अभ्यासकांनी या मांडणीला उत्स्फूर्तपणे दाद दिली.
कोल्हापूर : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यशाळेत कोल्हापुरातील शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांनी पोवाड्याचा इतिहास सांगून आकृतिबंधाची मांडणी केली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या लोककलेच्या अभ्यासकांनी या मांडणीला उत्स्फूर्तपणे दाद दिली.
मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासनामार्फत घेण्यात आलेल्या या ऑनलाईन कार्यशाळेत पोवाड्याचा आकृतिबंध या विषयावर कोल्हापुरातील शिवशाहीर राजू राऊत यांनी मार्गदर्शन केले. राऊत हे शाहिरीचे अभ्यासक असून, या विषयातील डॉक्टरेट त्यांनी संपादन केलेली आहे.
सुमारे दोन तास रंगलेल्या या व्याख्यानात राऊत यांनी अकराव्या शतकातील शाहिरीपासून वर्तमानातील शाहिरीपर्यंतचा रंजक प्रवास पोवाड्यांच्या सादरीकरणासह सांगितला. शाहिरीचा जागतिक प्रवास, त्याचे विविध प्रकार याची माहिती राऊत यांनी विविध कवने इतिहासाचे दाखले देत मांडल्यामुळे या कार्यशाळेतील हे सत्र उद्बोधक आणि प्रवाही झाले होते. या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये राज्यातील लोककलेचे अभ्यासक सहभागी झाले होते.
शिवकाळातील शाहिरी, ब्रिटिश काळातील शाहिरी, शाहू काळातील शाहिरीपासून वर्तमान काळातील सामाजिक विषयांची मांडणी करणारी परिवर्तनवादी, प्रबोधनात्मक शाहिरीपर्यंतचा मोठा कालखंड राऊत यांनी ओघवत्या भाषेत मांडला.