कोल्हापूरचा कुस्ती इतिहासही अधोरेखित व्हावा
By Admin | Published: June 9, 2017 01:18 AM2017-06-09T01:18:58+5:302017-06-09T01:18:58+5:30
हिंदकेसरी दीनानाथसिंह; महावीर फोगाट यांच्यावर आधारित ‘आखाडा’ पुस्तक प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दुसऱ्याच्या इतिहासावर किती दिवस टाळ्या वाजवायच्या? आता कोल्हापूरच्या कुस्तीचा इतिहासही अधोरेखित होऊ द्या. आपल्याकडेही कुस्तीतील दिग्गज रत्ने आहेत, असे प्रतिपादन हिंदकेसरी दीनानाथसिंह यांनी गुरुवारी केले. शाहू स्मारक भवन येथे महावीरसिंग फोगाट यांच्या संघर्षमय सत्यकथेवर आधारित ‘आखाडा’ पुस्तकाच्या मराठी अनुवादित आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ‘लेकींना उतरू द्या आखाड्यात’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हिंदकेसरी गणपतराव आंदळकर होते.
दीनानाथसिंह म्हणाले, काही वर्षांपूर्वी सातारा येथे कौशल्या वाघ नावाच्या मुलीने मुलांबरोबर कुस्ती करण्याचा आग्रह धरला. त्यात मी स्वत: व हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, हिंदकेसरी मारुती माने उपस्थित होतो. त्यात गणपतरावांनी त्या मुलीला तुला जोड नाही म्हणून हटकले. त्यानंतर कौशल्या आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली. अखेरीस आम्हाला तिच्याबरोबर एक युवा मल्ल खेळवावा लागला. तिने घुटना डावावर त्या पुरुष मल्लालाच चितपट केले. ‘दंगल’मधून अमीरखानने फोगाट परिवाराचा संघर्ष अधोरेखित केला. असाच मिल्खासिंग यांचाही इतिहास ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातून समोर आला. त्याप्रमाणे आपल्या कोल्हापूरच्या लाल मातीतील इतिहास अधोरेखित व्हावा.
पुस्तकाच्या अनुवादिका लीना सोहोनी म्हणाल्या, ‘दंगल’मध्ये फोगाट यांचा संघर्षमय जीवनपट लेखक सौरभ दुग्गल यांनी मांडला आहे.
लेखक सौरभ दुग्गल म्हणाले, मला वाटायचे, २००६ साली मास्टर चंदगीराम यांनी कुस्तीपटूने आयुष्यात एकदा तरी कोल्हापूरला भेट द्यावी अन्यथा त्या कुस्तीपटूचे जीवन निरर्थक आहे, असे भेटीदरम्यान सुनावले होते. २००९ साली गीता, बबिता आशियाई व पुढे लंडन आॅलिम्पिकमध्ये भेटल्या. त्यांचा इतिहास ‘आखाडा’रूपाने शब्दबद्ध केला. ’मेहता’चे सुनील मेहता यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर स्नेहा दुर्गुळे-इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.
हिंदकेसरींना पद्मश्री द्या!
फोगाट यांच्यासारखे काम कोल्हापूरच्या कुस्तीतही झाले आहे. त्या कुस्तीरत्नांपैकी शाहूनगरीचे पुत्र हिंदकेसरी गणपतराव आंदळकर व सांगलीचे स्वर्गीय हिंदकेसरी मारुती माने यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार द्यावा. आम्ही पैलवान गडी असल्याने उपोषणास बसू शकत नाही; तरी शासनाने याची दखल घ्यावी, असे आवाहनही दीनानाथसिंह यांनी केले. पुस्तक प्रकाशनप्रसंगी कोल्हापुरातील महिला कुस्तीगीर अंकिता शिंदे, सृष्टी भोसले, वैष्णवी कुशाप्पा यांचा सत्कार हिंदकेसरी दीनानाथसिंह व हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या हस्ते झाला.