"काकाने मारल्यानंतर ती मुलगी..."; कोल्हापुरातल्या हत्या प्रकरणाची फडणवीसांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 04:53 PM2024-08-22T16:53:34+5:302024-08-22T16:53:47+5:30
कोल्हापुरातल्या १० वर्षाच्या मुलीच्या हत्या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
Kollapur Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळलेली असताना कोल्हापुरातून एक हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. कोल्हापुरात दहा वर्षीय चिमुरड्या मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. पीडित मुलगी बुधवार दुपारपासून बेपत्ता होती. त्यानंतर सकाळच्या सुमारास एका शेतात तिचा मृतदेह सापडला. महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर असताना ही घटना उघडकीस आलीय. या प्रकरणावर बोलताना आरोपीला कठोर शिक्षा दिली जाणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूरमध्ये महायुतीचा लाडकी बहीण कार्यक्रम वचनपूर्ती सोहळा सुरू असतानाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापुरात एका दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. लैंगिक अत्त्याचार करून हा खून केल्याचा संशय आहे. करवीर तालुक्यातील शिये गावात दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. बुधवारी दुपारपासून मृत मुलगी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणावर बोलताना आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र्यांनी सांगितले.
या प्रकरणात बोलताना कोणालाही सोडलं जाणार नाही. गुन्हेगार कोणीही असला तरी त्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
"बिहारमधील हे कुटुंब इथं आलं होतं. काल दुपारी पीडितेच्या काकाने मारल्यामुळे ती घराबाहेर पडली होती. त्यानंतर रात्री १० वाजता मुलगी सापडत नसल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली. पोलिसांनी शोध घेतला असता सकाळी तिचा मृतदेह सापडलेला आहे. लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली आहे. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली आहे. कुठल्याही परिस्थितीत या घटनेच्या संपूर्ण तळाशी जाऊन जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा दिली जाईल. तसेच पीडित कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल," असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.