‘एचएमटी’च्या आठवणीचे ठोके कोल्हापूरच्या हृदयात कायम !

By admin | Published: September 13, 2014 12:38 AM2014-09-13T00:38:19+5:302014-09-13T00:38:32+5:30

कंपनी काळाआड : २२ वर्षे शहराशी जोडली होती नाळ

HMT memories hit Kolhapur's heart! | ‘एचएमटी’च्या आठवणीचे ठोके कोल्हापूरच्या हृदयात कायम !

‘एचएमटी’च्या आठवणीचे ठोके कोल्हापूरच्या हृदयात कायम !

Next


सतीश पाटील / शिरोली
रोज सकाळी सातच्या सुमारास ‘एचएमटी’ डबलडेकर पकडण्यासाठी सुरू असलेली महिलांची धडपड, केवळ महिला कामगारांनीच फुल्ल भरून जाणाऱ्या बसकडे असणाऱ्या प्रवाशांच्या नजरा व शिरोली औद्योगिक वसाहतीच्या ‘एचएमटी’ स्टॉपवर सायंकाळी चारला पुन्हा डबलडेकर पकडण्यासाठी उडणारी झुंबड, हे जादा नव्हे तर १५ वर्षांपूर्वीचे शहरातील चित्र.
कोल्हापुरातील सुमारे १२० कुटुंबांची आर्थिक नाडी सांभाळणारी हिंदुस्थान मशीन टुल्स तथा अभिजात समयदर्शिका (एचएमटी) ही घड्याळ बनविणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी सुमारे २२ वर्षे येथे चांगल्या प्रकारे कार्यरत होती. त्यामुळे अनेक कुटुंबांबरोबर कोल्हापूरच्या जीवनाचा एक भागच ही कंपनी बनली होती.
महिलांना रोजगार मिळावा म्हणून ज्येष्ठ उद्योजक शिवाजीराव देसाई व तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे १९७८ साली पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या पुढाकाराने शिरोली औद्योगिक वसाहतीत ‘अभिजात समयदर्शिका’ ही ‘एचएमटी’चे घड्याळ तयार करणारी कंपनी सुरू झाली.
या कंपनीत बंगलोरहून घड्याळाचे सुटे भाग येत होते. हे सर्व सुटे भाग जोडून येथे घड्याळ तयार होत असे. जवळपास महिन्याला ६० हजार घड्याळे तयार होत होती. विशेष म्हणजे कंपनीत सर्वच१२० कर्मचारी महिला होत्या. या महिलांना कंपनीत जाणे-येणे सोपे व्हावे, यासाठी महापालिकेतर्फे १९८०च्या दरम्यान ‘एचएमटी’ या नावाने खास डबलडेकर बसची सोयही करण्यात आली होती. त्यावेळी महिलांना प्रति महिना एक हजार ते बाराशे रुपये पगार होता.
साधारण २००० सालापर्यंत ही कंपनी अतिशय जोरातचालली होती; पण सार्वजनिक क्षेत्रातील ‘एचएमटी’ कंपनीला कालपरत्वे बदल व योग्यप्रकारे मार्केटिंग करता आले नाही. बाजारात अनेक नवीन कंपन्या आल्यामुळे बाजारात मोठी स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे शिरोली येथील युनिटमध्ये तयार होणारी घड्याळे उचलली गेली नाहीत. मागणी कमी झाल्यामुळे २००० साली ही कंपनी बंद पडून अवसायनात गेली. यानंतर तीन ते चार वर्षे कर्मचाऱ्यांनी ही कंपनी चालू करावी, पगार मिळावा, यासाठी आंदोलने केली. महाराष्ट्र शासनाकडे दाद मागितली; पण शासनाने याकडे लक्ष न दिल्याने अखेर कंपनी बंद पडली.
कर्मचाऱ्यांची पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळाने पगार, देणी भागविली असली तरी कोल्हापूरच्या उद्योगजगताचे मोठे नुकसान झाले आणि २००३-०४ साली ही कंपनी लिलावात काढली. ज्येष्ठ उद्योगपती बापूसाहेब जाधव यांच्या ‘सरोज ग्रुप’ने ही कंपनी विकत घेतली आहे.

Web Title: HMT memories hit Kolhapur's heart!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.