सीबीआय-एसआयटी समन्वयाबाबत बैठक घेवू

By admin | Published: December 16, 2015 12:19 AM2015-12-16T00:19:53+5:302015-12-16T00:20:24+5:30

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : नागपुरात मेघा पानसरे, हमीद दाभोलकर यांच्याशी चर्चा

To hold a meeting with CBI-SIT coordination | सीबीआय-एसआयटी समन्वयाबाबत बैठक घेवू

सीबीआय-एसआयटी समन्वयाबाबत बैठक घेवू

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासाबाबत सीबीआय व एसआयटीमधील समन्वयाबाबत बैठक घेतली जाईल. तसेच या तपासासाठी पूर्णत: योगदान देणारे पथक नियुक्त केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती डॉ. मेघा पानसरे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.
ज्येष्ठ कामगार नेते पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासाबाबत डॉ. पानसरे, हमीद दाभोलकर, अविनाश पाटील आणि संजय शेंडे यांच्या शिष्टमंडळाने नागपुरातील विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये २० मिनिटांहून अधिकवेळ चर्चा झाली. याबाबतची माहिती देताना डॉ. पानसरे यांनी सांगितले की, आम्ही मागणी केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर सहमत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासाबाबत सीबीआय आणि एसआयटीत समन्वय रहावा, यासाठी बैठक घेतली जाईल. तपास प्रक्रियेत पूर्णत: योगदान देणारी टीम कार्यान्वित केली जाईल असे त्यांनी आश्वस्त केले. सनातन संस्थेच्या काही कार्यक्रमांत भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिसून आल्याचे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले, त्यावर संबंधित संस्थेच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. या संस्थेच्या कार्यक्रमांत सहभागी होवू नये यासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना समज दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. (प्रतिनिधी)

दाभोलकर, पानसरे हत्या : शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या
पानसरे यांच्या खुनाच्या तपासामध्ये कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची बदली चालू तपास गतीवर महत्त्वाचा प्रभाव टाकू शकते. त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी अथवा त्यांच्या जागी तपासाची माहिती असलेल्या सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी.
तपासाबाबत जी स्पेशल तपास टीम तयार केलेली आहे, त्यांना बाकीच्या अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्यामुळे तपासाच्या गतीवर परिणाम होत आहे. तरी या स्पेशल तपास टीममधील प्रमुख आणि इतर अधिकारी यांना इतर कामे न देता केवळ पानसरे खुनाच्या तपासाचे काम द्यावे.
डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या यंत्रणांची नियमित संयुक्त बैठक होऊन त्याचा गृहमंत्री या नात्याने आपण स्वत: आढावा घ्यावा.
डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाईसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट कुटुंबीयांना मिळावी, यासाठी आपण आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.
डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या खुनाच्या घटनांमधील संशयित संघटनांवर कायद्याच्या चौकटीत बसणारी कारवाई करावी. संबंधित संस्थांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे. या संस्थांना पाठबळ देणारे पक्ष, संस्था आणि संघटनांना समज देण्यात यावी.

Web Title: To hold a meeting with CBI-SIT coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.