नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्दसाठी ‘पीपल्स’ रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 04:42 PM2020-02-17T16:42:53+5:302020-02-17T16:45:34+5:30
केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘रद्द करा...रद्द करा..., नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा...’अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘रद्द करा...रद्द करा..., नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा...’अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर व प्रदेश सदस्य नंदकुमार गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केले. यावेळी कार्यकर्त्यांनी या कायद्याला विरोधासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
या ठिकाणी ‘भाकप’चे नेते दिलीप पवार, ‘माकप’चे चंद्रकांत यादव, लाल निशान पक्षाचे अतुल दिघे, कॉँग्रेसचे अॅड. गुलाबराव घोरपडे, राष्ट्रवादीचे अॅड. अशोकराव साळोखे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, आदी मान्यवरांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.
दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, वसंतराव मुळीक, चंद्रकांत यादव, अशोकराव साळोखे, अतुल दिघे, सोमनाथ घोडेराव, आदींनी आपल्या भाषणातून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात टीका केली. जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा व राज्यसभेत मंजूर करण्यात आलेला हा कायदा देशहिताचा नाही. यामुळे जनतेमध्ये दुही निर्माण होणार आहे. या जुलमी कायद्याने दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजाचे जीवन उद्ध्वस्त करणारा आहे. देशाने राज्यघटनेची तत्त्वप्रणाली स्वीकारली असताना धर्मावर आधारित व्यवस्था निर्माण करणे म्हणजे पुन्हा एकदा देश फाळणीकडे नेण्याचा भाजप सरकार प्रयत्न करीत आहे.
आंदोलनात रमेश पाचगावकर, अब्बास शेख, जयसिंग कांबळे, आनंदा कांबळे, जितेंद्र कांबळे, निवास सडोलीकर, रतन कांबळे, विलास भास्कर, शिवाजी कांबळे, वाय. के. कांबळे, माधुरी कांबळे, मच्छिंद्र राजशिल, आदी सहभागी झाले होते.