नागरिक दुरुस्ती कायद्याविरोधी बिंदू चौकात धरणे, निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:30 AM2020-01-21T11:30:48+5:302020-01-21T11:32:44+5:30
‘संविधान बचाव-देश बचाव, इन्कलाब झिंदाबाद’ अशा घोषणा देत ‘संविधान वाचवा, देश वाचवा कृती समिती’च्यावतीने सोमवारी सायंकाळी बिंदू चौकात धरणे आंदोलन करीत नागरिक दुरुस्ती विधेयकांविरोधी महिलांनी निदर्शने केली. आंदोलकांनी, ‘नो सीसीए, नो एनआरए, नो एनपीआर’ अशा काळ्या रंगातील पट्ट्या कपाळावर बांधून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.
कोल्हापूर : ‘संविधान बचाव-देश बचाव, इन्कलाब झिंदाबाद’ अशा घोषणा देत ‘संविधान वाचवा, देश वाचवा कृती समिती’च्यावतीने सोमवारी सायंकाळी बिंदू चौकात धरणे आंदोलन करीत नागरिक दुरुस्ती विधेयकांविरोधी महिलांनी निदर्शने केली. आंदोलकांनी, ‘नो सीसीए, नो एनआरए, नो एनपीआर’ अशा काळ्या रंगातील पट्ट्या कपाळावर बांधून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.
नागरिक दुरुस्ती विधेयक कायद्याला विरोध करण्यासाठी, तसेच दिल्लीतील शाहीन बाग येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवारी सायंकाळी ऐतिहासिक बिंदू चौकात ‘संविधान वाचवा, देश वाचवा कृती समितीच्या’वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुस्लिम महिलांची संख्या लक्षणीय होती.
नगरसेविका निलोफर आजरेकर, नगरसेविका वहिदा सौदागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. बिंदू चौकात धरणे आंदोलनात महिला आंदोलकांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायद्याला विरोध करणाऱ्या काळ्या रंगातील पट्ट्या कपाळावर बांधून निषेध नोंदविला. आंदोलकांनी इन्कलाब झिंदाबाद, संविधान वाचवा-देश वाचवा, वुई वाँट जस्टिस, संविधान विरोधी कायदे रद्द करा, अशी निदर्शने केली. या आंदोलनामुळे बिंदू चौक दुमदुमला.
या आंदोलनस्थळी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी उपस्थिती दाखवून पाठिंबा व्यक्त केला. याशिवाय प्रतिमा सतेज पाटील, महिला फेडरेशनच्या डॉ. मेघा पानसरे यांच्यासह वंचित बहुजन विकास आघाडीच्या डॉ. अरुणा माळी, अॅड. उज्ज्वला कदम, डॉ. रुबिना महाबरी, आदींनी भाषणातून ‘एनसीआर’ला विरोध दर्शवित आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले. सायंकाळी उशिरा राष्ट्रगीताने धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.
या आंदोलनात, सोफिया म्हेत्तर, तबस्सुम मुल्ला, आसमा शेख, सीमा मोडक, किस्मत शेख, स्नेहल कांबळे, सुनीता पाटील, शुभांगी पाटील, अनिता जाधव, रूपाली कुराडे, सुनीता अमृतसागर, सुमन वाडेकर, संजीवनी चव्हाण यांच्यासह राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सहभागी झाल्या होत्या.
विरोधाचे फलक झळकले
आंदोलनात लहान मुली, युवतींचाही मोठ्या संख्येने समावेश होता. मुलींसह महिलांच्या हातात ‘एनसीआर’ला विरोध करणारे फलक, तसेच भारताचा तिरंगा ध्वज झळकत होते.