बिंदू चौकात कृषी विधेयकांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:37+5:302021-01-16T04:28:37+5:30
कोल्हापूर : माेदी सरकार चले जाव, दादागिरी नही चलेगी, मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत अन्यायकारक तीन कृषी ...
कोल्हापूर : माेदी सरकार चले जाव, दादागिरी नही चलेगी, मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत अन्यायकारक तीन कृषी कायदे व वीज बिल विधेयकांची शुक्रवारी संध्याकाळी बिंदू चौकात होळी करण्यात आली. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, रवी जाधव, टी.एस. पाटील, संभाजी जगदाळे, रमेश वडणगेकर यांनी केले.
कृषी कायदे रद्दच्या मागणीसाठी गेले दोन महिने दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत; पण त्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. आता न्यायालयाने अंमलबजावणीस स्थगिती दिली असली तरी लढा थांबलेला नाही. त्यामुळे त्यांना पाठबळ देण्यासाठी बिंदू चौकात हे आंदोलन केले. हे कायदे मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार आहे. दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल, असे नामदेव गावडे, संभाजी जगदाळे, सतीशचंद्र कांबळे यांनी मनोगतात सांगितले. कोणत्याही आंदोलनात कोल्हापूरकर कायमच आघाडीवर असतात, या आंदोलनातही कायमच आघाडीवर राहू, असे चंद्रकांत यादव यांनी सांगितले.
फोटो: १५०१२०२१-कोल-कृषी होळी
फोटो ओळ: अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी बिंदू चौकात कृषी कायद्यांची होळी करण्यात आली.
(छाया: आदित्य वेल्हाळ)