विधायक उपक्रमांनी कोल्हापुरात होळी
By Admin | Published: March 13, 2017 02:28 PM2017-03-13T14:28:17+5:302017-03-13T14:28:17+5:30
पंचगंगा स्मशानभूमीसाठी ३ लाख शेणी दान
विधायक उपक्रमांनी कोल्हापुरात होळी
पंचगंगा स्मशानभूमीसाठी ३ लाख शेणी दान
कोल्हापूर : अनिष्ट विचार, वृत्तीचे दहन करुन मांगल्याची कास धरण्याची शिकवण देणारा होळी सण रविवारी कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. टिमक्यांच्या टिमटिमाटावर होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत लहान मुलांसह तरुणाईने होळीभोवती शंखध्वनी केला. दुसरीकडे होळीच्या नावाखाली लाकूड, शेणी अग्नीत लोटण्याऐवजी विविध संस्था संघटनांनी हे नैसर्गिक इंधन पंचगंगा स्मशानभूमीकडे सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे एका दिवसातच स्मशानभूमीत २ लाख ७३ हजार २६४ इतक्या शेणी जमा झाल्या.
मराठी महिन्यातील शेवटचा सण म्हणून होळी साजरी केली जाते. रविवारी सुट्टी असल्याने घरोघरी सणाची लगबग होती. पुरणपोळी, बटाट्याची भाजी, सांगडे, पापड अशा पंचपक्वानांना सर्वत्र दरवळ सुटला होता. प्रत्येकाच्या दारात सजलेल्या रांगोळीवर छोटी होळी पेटवण्यात आली. त्या भोवतींने टिमक्या, ढोल-ताशांच्या कडकडाटात लहान मुलं आणि मोठ्याने बोंबलू नका रे म्हणत होळी भोवती शंखध्वनी केला. संध्याकाळी गल्लोगल्ली, कॉलन्यांमध्ये, तसेच मंडळांद्वारे होळी पेटवण्यात आली.
अंबाबाई मंदिराबाहेरही पारंपारिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली. काही मंडळांनी होळीच्या मध्यभागी भ्रष्टाचार, दहशतवाद, आळसरुपी रावणाची प्रतिकृती लावली होती. अशा वाईट वृत्तींना अग्नीत टाकण्याचा संदेश देवून सणाला विधायकतेची जोड दिली. ज्ञानदीप विद्यामंदीर येथे गुटखा, तंबाखुच्या पुड्या, सिगारेट, बिडी यांची होळी करण्यात आली. सिद्धार्थनगर येथील योद्धा बॉईजच्यावतीने सिद्धार्थ नगर कमान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. अचानक तरुण मंडळातर्फे पंचगंगा स्मशानभूमीला ५१ हजार शेणी दान करण्यात आले. नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील समितीने एक लाख २५ हजार शेणी जमा करण्यात आल्या. सम्राटनगर फ्रेंडस सर्कलच्यावतीने ११ हजार शेणी दान करण्यात आल्या. तसेच महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीनेही स्मशानभूमीसाठी शेणी दान करण्यात आल्या.
पोळी दान-होळी लहान उपक्रमाला प्रतिसाद
पुरोगामी संस्थांकडून गेल्या काही वर्षांपासून पोळी दान-होळी लहानचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. एकीकडे वंचितांना अन्न मिळत नसताना पुरणाची पोळी अग्नीत टाकण्याऐवजी ती एकत्र गोळा करुन परिसरातील गरजूंना देण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेतला. पाचगावमधील मगदूम कॉलनीतील नागरिकांनी पोळीचे संकलन करुन ते अनाथाश्रम व वृद्धाश्रमांना दिले.