गडहिंग्लजला केंद्रीय प्रवेश स्थगिती आदेशाची होळी
By admin | Published: June 10, 2017 12:50 AM2017-06-10T00:50:35+5:302017-06-10T00:50:35+5:30
तत्काळ नव्याने मान्यता : विविध संघटनांचा साखर वाटून आनंदोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी अचानक काढण्यात आलेल्या आदेशाची विविध पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथील प्रांतकचेरीसमोर होळी केली. स्थगिती करण्यात आलेली ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे लेखी आदेश मिळाल्यानंतर साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावर्षीपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय महिन्यापूर्वीच येथील संस्थाचालक, प्राचार्य, पदाधिकारी व अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर ही प्रक्रिया राबविण्याचा हालचाली सुरू झाल्या होत्या. दरम्यान, त्यास ‘स्थगिती’चा आदेश देण्यात आला. त्यामुळे येथील पक्ष-संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे सभापती प्रा. जयश्री तेली व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार हाळवणकर यांच्यामार्फत शिक्षणमंत्र्यांशी संपर्क साधून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार प्रक्रियेस पुन्हा मान्यता देण्यात आली. मात्र, लेखी आदेशाच्या मागणीवर संघटना ठाम राहिल्या.
विद्यार्थी, पालकांची मागणी आणि सर्वांच्या संमतीने सुरू झालेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत अडथळा आणणारे आणि स्थगिती देणाऱ्यांच्या निषेधार्थ विविध संघटनांनी शुक्रवारी सकाळी येथील प्रांतकचेरीसमोर धरणे आंदोलन करून स्थगिती आदेशाची होळीदेखील केली. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेस वरिष्ठ कार्यालयाकडून पुन्हा मान्यता मिळाल्याचा लेखी आदेश येथील शिक्षण विभागातर्फे आंदोलनस्थळी पोहोचविण्यात आला.
यावेळी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक म्हणाले, गडहिंग्लज विभागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सुरू झालेल्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांची नावे जनतेच्या माहितीसाठी जाहीर केली पाहिजेत. ही प्रक्रिया पारदर्शकपणे न राबविल्यास पुन्हा आंदोलन छेडले जाईल.
युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष व पं. स. सदस्य विद्याधर गुरबे म्हणाले, केंद्रीय प्रवेशासाठी एकत्र आलेल्या सर्व संघटनांच्या एकजुटीचा हा विजय आहे. यापुढेही शैक्षणिक विषयांसह सर्व सामाजिक प्रश्नांसाठी एकजुटीने लढा देण्याची गरज आहे.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शिवसेना तालुकाध्यक्ष दिलीप माने यांचीही भाषणे झाली.
आंदोलनात माजी जि.प. सदस्य शिवप्रसाद तेली, पं. स. सदस्य इराप्पा हसुरी, अॅड. दशरथ दळवी, अजित बंदी, प्रशांत देसाई, अवधूत पाटील, प्रतीक क्षीरसागर, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.