अबकारी कर नोटिसीची होळी
By admin | Published: March 25, 2016 12:52 AM2016-03-25T00:52:24+5:302016-03-25T00:53:30+5:30
सराफांचे आंदोलन : लोकसभेत आवाज उठविणार - धनंजय महाडिक
कोल्हापूर : सराफ व्यावसायिकांच्या वतीने गुजरी कॉर्नर येथे अबकारी कराच्या नोटिसीची होळी करण्यात आली. सराफ व्यावसायिकांनी केंद्र शासनाच्या नावे शंखध्वनी केला. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट देत अबकारी करप्रश्नी लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन सराफ व्यावसायिकांना दिले. गेल्या २३ दिवसांपासून सराफ व्यावसायिकांचे बंद आंदोलन सुरू आहे.
खासदार महाडिक म्हणाले, ‘अच्छे दिन’वाल्या सरकारने एकतर्फी निर्णय आपल्यावर लादला आहे. याला वेगळ्या पद्धतीने दबावगट निर्माण करावा लागेल. पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा अधिवेशनामध्ये तर या प्रश्नावर आवाज उठविणार आहेच; त्याशिवाय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर बैठक घेऊन आंदोलनाची दाहकता त्यांना पटवून देऊ, असे ते म्हणाले.
सराफ व्यावसायिकांच्या वतीने महाडिक यांना निवेदन दिले. सुरेश गायकवाड यांनी स्वागत केले. भरत ओसवाल यांनी आंदोलनाची माहिती दिली. कुलदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. माणिक जैन, राजेश राठोड, नगरसेवक ईश्वर परमार, किरण नकाते, सुरेश ओसवाल, संपत पाटील, बाबा महाडिक, सुहास जाधव, धर्मपाल जिरगे, जितेंद्रकुमार राठोड, किशोर परमार, बाबूराव जाधव यांच्यासह गांधीनगर येथील अशोक रूपाणी, रतन साधवानी, सुदर्शन साधवानी, किरण माणगावकर आणि श्री. पोतदार, आदी उपस्थित होते.
यावेळी अबकारी कराच्या नोटिसीची होळी करून शंखध्वनी करण्यात आला. याअगोदर सराफ संघाच्या इमारतीत व्यावसायिकांची बैठक झाली. त्यामध्ये वरिष्ठ स्तरावरून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत बंद आंदोलन मागे घेणार नसल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सराफ बाजारातून शंखध्वनी करीत फेरी काढली. (प्रतिनिधी)
उद्या मानवी साखळी
कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि जिल्हा संघातर्फे उद्या, शनिवारी दुपारी चार वाजता मानवी साखळीचे आयोजन केले आहे. गुजरी कॉर्नर येथे सुरू होणाऱ्या
या मानवी साखळीत सर्व सराफ व्यावसायिक, कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामध्ये जिल्ह्णाबरोबर सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्णांतील सराफ बंधू उपस्थित राहणार आहेत.