शिवसेनेकडून कोल्हापूरात महागाईच्या भस्मासुराची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 05:40 PM2017-09-23T17:40:00+5:302017-09-23T17:47:44+5:30
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत चाललेल्या दरामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला असून, त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी शिवसेनेच्यावतीने बिंदू चौकात महागाईच्या भस्मासुराची होळी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या नावाने शंखध्वनी करीत महिलांनी आपला संताप व्यक्त केला.
कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत चाललेल्या दरामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला असून, त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी शिवसेनेच्यावतीने बिंदू चौकात महागाईच्या भस्मासुराची होळी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या नावाने शंखध्वनी करीत महिलांनी आपला संताप व्यक्त केला.
शहर व जिल्हा शिवसेनेच्यावतीने बिंदू चौकात एरंडाच्या झाडाला महागाईचे फलक लावून त्याची होळी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. सामान्य माणसाला अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले; पण ते दिवस शोधण्याची वेळ आली आहे. सामान्य माणसाच्या खिशातून काढून घेऊन उद्योगपतींच्या तुंबड्या भरण्याचा उद्योग सरकारने सुरू केला आहे. पण, हे कदापि खपवून घेणार नसून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहेत. प्रतीकात्मक महागाईच्या भस्मासुराचे दहन करून जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, शिवाजीराव पाटील, रवी चौगुले, हर्षल सुर्वे, भिकाजी हळदकर, बाजीराव पाटील, अशोक पाटील, राजू यादव, डॉ. के. एम. पाटील, अरविंद पाटील, रणजित आयरेकर, शुभांगी पोवार, मेघना पेडणेकर, दीपाली शिंदे, सुनीता निकम, जयश्री खोत, आदी उपस्थित होते.
दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर यांनी नागाळा पार्क येथील पेट्रोलपंपासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले, काँग्रेस सरकार व आताच्या सरकारच्या काळातील कच्च्या तेलाच्या दरात मोठी तफावत आहे. दर ६० टक्क्यांनी कमी झाले असताना पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. गोरगरिबांच्या खिशातून काढायचे आणि श्रीमंतांच्या खिशात घालण्याचा उद्योग सुरू आहे.
भाववाढीतून पैसे कमवायचे आणि १ लाख १० हजार कोटींची बुलेट ट्रेन सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते खपवून घेणार नाही. सत्तेवर येताना सोशल मीडियाचा आधार घेतला; मग आता सोशल मीडिया तुमच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत आहे म्हणून त्यावर बंदी घालणे चुकीचे आहे. ही हिटलरशाही सहन करणार नाही. यावेळी सुनील जाधव, किशोर घाटगे, आदी उपस्थित होते.