स्पर्धा परीक्षांबाबतच्या ‘एमपीएससी’च्या पत्रकाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:05+5:302021-01-01T04:18:05+5:30
कोल्हापूर : विविध शासकीय पदांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षा देण्याच्या मर्यादेबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) निर्णयाच्या परिपत्रकाची कोल्हापुरातील सकल मराठा ...
कोल्हापूर : विविध शासकीय पदांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षा देण्याच्या मर्यादेबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) निर्णयाच्या परिपत्रकाची कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने गुरुवारी दसरा चौकामध्ये होळी केली. राज्य शासनाने ‘एमपीएससी’बाबतचा हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
‘अन्यायकारक निर्णय मागे घेतलाच पाहिजे’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘एक मराठा लाख मराठा’, अशा घोषणा देत सकल मराठा समाजातील बांधव, विद्यार्थी आणि अखिल भारतीय मराठा महासंघातील पदाधिकारी, सभासदांनी ‘एमपीएससी’च्या परिपत्रकाची होळी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली असून, ‘सारथी’बाबत गोंधळ सुरू आहे. अशा स्थितीत आता ‘एमपीएससी’ने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त सहावेळा परीक्षा देता येईल, असा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. त्याचा फटका मराठा समाजातील युवक-युवतींना बसणार आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही या निर्णयाच्या परिपत्रकाची होळी केली आहे. हा निर्णय राज्य शासन, एमपीएससीने त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अवधूत पाटील यांनी दिला.
प्रतीकसिंह काटकर, पवन पवार आदी विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रकाश पाटील, महादेव पाटील, शंकरराव शेळके, प्रताप नाईक-वरूटे, दीपक पाटील, शैलेजा भोसले, संजीवनी चौगुले आदी उपस्थित होते.
चौकट
‘सारथी’ पुन्हा सुरू करावी
सचिवालय हे मराठा समाजाच्या विरोधात काम करत आहे. शासनाने आरक्षणाबाबत सकारात्मक पावले टाकावीत. ‘सारथी’ संस्था पुन्हा ताकदीने सुरू करावी, अशी मागणी अवधूत पाटील यांनी केली.